लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाशेजारील पदपथावर दोघांनी आपल्यावर अत्याचार केल्याची तक्रार २९ वर्षीय महिलेने केली आहे. त्यानुसार माता रमाबाई आंबेडकर (एमआरए) मार्ग पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो एमआरए पोलिसांकडे वर्ग केला आहे. पीडित महिला नवी मुंबईतील मिनाताई ठाकरे रुग्णालयात उपचार घेत आहे. ही घटना २२ सप्टेंबर रोजी घडल्याची तक्रारी पीडित महिलेने केली आहे. दोन आरोपीनी पीडित महिलेला उचलून बस आगाराच्या शेजारी असलेल्या टॅक्सी थांब्याजवळील पदपथावर नेले आणि तेथे तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
आणखी वाचा-बनावट पारपत्राच्या आधारे परदेशात जाण्याचा प्रयत्न, विमानतळावरून महिलेला अटक
आरोपींनी २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री पीडित महिलेवर आळीपाळीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपींनी महिलेचे तोंड दाबल्यामुळे तिला आरडाओरडा करता आला नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवून हा गुन्हा एमआरए मार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे. एमआरए मार्ग पोलीस परिसरातील सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने तपास करीत आहेत.