नेमके काय आहे प्रकरण वाचा…
‘लिव्ह इन पार्टनर’चा दाऊद टोळी अथवा दहशतवादी संघटनेसोबत संबंध आहे. तसेच त्याने घरातील ५० लाख रुपयांचे दागिने चोरले असून त्याच्याकडे बंदुक असल्याची तक्रार कुलाबा येथील ५४ वर्षीय महिलेने पोलिसांकडे केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी ४५ वर्षीय व्यक्तीला अटक केली. पण चौकशीअंती आरोपी आपल्याला सोडून दुसऱ्या महिलेकडे राहण्यासाठी गेल्यामुळे तक्रारदार महिलेने हा खोटा गुन्हा दाखल केल्याचे उघड झाले आणि या प्रकारामुळे पोलिसही चक्रावले.
हेही वाचा >>> बीडीडी चाळ प्रकल्पात म्हाडाला तोटा!- मुंबई मंडळाच्या लेखाधिकाऱ्यांकडून घरचा आहेर
कुलाबा येथे वास्तव्यास असलेल्या ५४ वर्षीय तक्रारदार महिलेचा मालमत्ता खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. ती गेल्या काही वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये ४५ वर्षीय व्यक्तीसोबत राहात होती. तो मूळचा सिंधुदुर्ग येथील रहिवासी असून त्याचा दागिन्यांचा व्यवसाय आहे. या महिलने ११ जुलै रोजी कुलाबा पोलिसांकडे ‘लिव्ह इन पार्टनर’विरोधात तक्रार केली होती. तिचा ‘लिव्ह इन पार्टनर’ ३ जुलैला तडकाफडकी घर सोडून निधून गेला होता. बॅग भरताना त्याच्याकडे बंदुक असल्याचे आपल्या निदर्शनास आले. मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण तो थांबला नाही. त्याचा दाऊद टोळी अथवा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचे तिने तक्रारीमध्ये नमुद केले. तेवढ्यावरच ती थांबली नाही, तर तिने या प्रकरणी नागपाडा येथील दहशवात विरोधी पथक व केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांच्याकडेही तक्रार केली.
दरम्यान, महिलेला तिच्या कपाटाच्या तिजोरीतून ५० लाख रुपयांचे दागिने आणि मौल्यवान वस्तू गायब असल्याचे ११ जुलै रोजी आढळले. त्यानंतर तिने कुलाबा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ‘लिव्ह इन पार्टनर’ने तिच्या सुमारे ५० लाख रुपयांच्या मौल्यवान वस्तू चोरल्या आणि त्याच्याकडे परवाना नसलेली बंदूक होती, असे तिने पोलिसांना सांगितले. तसेच त्याच्या व्हॉट्स ॲप संदेशावरून त्याचे दाऊद टोळी अथवा दहशवाद्यांशी संबंध असल्याचा संशय तिने व्यक्त केला. पोलिसांनी संबंधीत प्रकरण योग्यरितीने हाताळले नसल्याचा आरोप तिने केला.
हेही वाचा >>> मुंबई: ‘मेट्रो १’ची प्रवासी संख्या वाढली; प्रवासी का वळले मेट्रोकडे…नेमके कारण जाणून घ्या…
पोलिसानी याप्रकरणी शनिवारी महिलेचा ‘लिव्ह इन पार्टनर’ व त्याच्या एका साथीदाराला अटक केली. महिलेने आरोपीविरोधात खोटी तक्रार दाखल केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले. त्याने महिलेला सोडून उल्हासनगरमधील दुसऱ्या महिलेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महिलेने तक्रार केल्याचे निष्पन्न झाले. यासंदर्भात पोलिसांनी महिलेच्या घरातील नोकराचा जबाब नोंदवला असून घर सोडताना आरोपीकडे कोणतीही बंदुक नव्हती, असे नोकराने सांगितले. यापूर्वीही दोघांचे भांडण झाल्यानंतर आरोपी घर सोडून निघून गेला होता. पण महिलेने समजूत काढून त्याला परत आणले होते. यावेळी त्याचा मोबाइल बंद होता. त्यामुळे त्याचा कोणताही थांगपत्ता महिलेला लागला नाही. तसेच त्याचा दाऊद टोळीशी संबंध असल्याचे कोणतेही पुरावे पोलिसांना सापडले नाही. या प्रकरणी पुढील कारवाई करण्यासाठी पोलीस कायदेशीर सल्ला घेत आहेत.