मुंबई : समाजमाध्यमांवर ओळख झालेल्या एका भामट्याने ४५ वर्षीय महिलेला तिची अश्लील चित्रफीत समाजमाध्यमांवर टाकण्याची धमकी देऊन तिच्याकडून ७१ हजार रुपये उकळल्याचा प्रकार मुलुंड येथे घडली. याप्रकरणी महिलेने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत.
पीडित महिला मुलुंड परिसरात राहते. काही दिवसांपूर्वी तिची समाजमाध्यमांवर एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. त्याने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत मोबाइलवर बोलणे सुरू केले. तिला बोलण्यात गुंतवून आरोपीने तिची अश्लील चित्रफीत तयार केली. याचदरम्यान आरोपीने विविध कारण सांगून तिच्याकडे पैशांची मागणी सुरू केली.
हेही वाचा >>>‘कोल्ड प्ले’साठी मुंबई-अहमदाबाद विशेष रेल्वेगाड्या
पहिल्यांदा या महिलेने त्याला काही पैसे दिले. मात्र त्यानंतर त्याची मागणी वाढत असल्याने तिने त्याला पैसे देण्यास नकार दिला. यावेळी आरोपीने अश्लील चित्रफीत समाजमाध्यमांवर टाकण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे उकळायला सुरुवात केली. घाबरलेल्या महिलेने त्यानंतरही त्याला पैसे दिले. मात्र त्याची मागणी वाढत असल्याने अखेर महिलेने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.