मुंबई : विनयभंगाच्या प्रकरणात महिलाही दोषी ठरू शकते, असे स्पष्ट करून एका ३८ वर्षांच्या महिलेला दुसर्या महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली महानगरदंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरवले व एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडण्यादरम्यान आरोपी महिलेने तक्रारदार महिलेला मारहाण करून तिचे कपडे फाडले होते. एवढेच नव्हे, तर पतीला तिच्यावर बलात्कार करण्यासही सांगितले. दोन्ही कुटुंबीयांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू होता, असा पोलिसांचा आरोप होता.
आरोपीने तक्रारदार महिलेचा विनयभंग होईल, अशी वागणूक तिला दिली. शिवाय तिला मारहाण करून आणि तिचे कपडे फाडले. खासगी आयुष्य जगण्याच्या तिच्या अधिकाराचाही भंग केला. हे सगळ्या साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीपुराव्यांवरून सिद्ध झाले. त्याचप्रमाणे हा सगळा प्रकार सुरू असताना इमारतीतील पुरुषही तेथे उपस्थित असल्याचेही साक्षीदारांनी सांगितले.आरोपीला न्यायालयाने सहा हजार रुपयांचा दंड सुनवला. आरोपी तीन मुलांची आई आहे ही आणि अन्य बाबी लक्षात घेऊन तिला पाच वर्षांच्या शिक्षेऐवजी किमान एक वर्षाची शिक्षा सुनावत असल्याचे न्यायालयाने म्हटले.
दरम्यान, आरोपीच्या आईशी आपले सौहार्दपूर्ण संबंध होते. त्याचमुळे आरोपी आणि आपल्यात वाद झाला, असे तक्रारदार महिलेने साक्ष देताना न्यायालयाला सांगितले. आरोपीने तिच्यावर आधी चप्पल फेकली. नंतर दुसऱ्या चप्पलने तिच्या डोक्यावर मारले. एका प्रत्यक्षदर्शीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपीने आपला गळा पकडून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि कपडे फाडले, असेही तक्रारदार महिलेने न्यायालयाला सांगितले.
हेही वाचा: पासपोर्टसाठी बनावट कागदपत्र सादर करणार्या त्रिकुटाला अटक
न्यायालयाचे म्हणणे…
विनयभंग करण्याच्या हेतूने पुरुषांप्रमाणेच महिलेकडूनही एखाद्या महिलेवर बळाचा वापर केला जात असेल किंवा तिला मारहाण केली जात असेल तर महिलेलाही विनयभंगाच्या आरोपाखाली दोषी ठरवता येते. स्त्री-पुरुष जन्मजात भेदामुळे स्त्रीला या आरोपांतून वगळण्यात यावे असे कायद्यात कुठेही लिहिलेले नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.