मुंबई : महिला सहकर्मचाऱ्यावर अत्याचार करून तिच्याकडून ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली साकिनाका पोलिसांनी ३७ वर्षीय व्यक्तीला अटक केली. आरोपीने पीडित महिलेच्या मोबाइवरून जबरदस्तीने रक्कम हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडित महिलेने चुकीचा पिन क्रमांक सांगितल्याचा राग धरून आरोपीने तिला मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी बलात्कार व खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करत आहेत
तक्रारदार महिला (३० वर्षे) अंधेरी परिसरातील रहिवासी आहे. तक्रारीनुसार, आरोपीने कामाच्या नावाखाली महिलेला दुचाकीवर बसवले व तिला साकीनाका येथील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे पीडित तरूणीवर अत्याचार केला. यावेळी आरोपीने पीडित महिलेचा मोबाइल घेऊन स्वतःला ५० हजार रुपये गुगल पे करण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी पीडित महिलेने चुकीचा पिन क्रमांक दिल्यामुळे व्यवहार होऊ शकला नाही. त्याने पुन्हा प्रयत्न केला. पण त्यावेळीही रक्कम हस्तांतरीत झाली नाही. त्यावेळीही पिन चुकीचा असल्याचे त्याला समजले. अखेर त्याने रागाने पीडित तरूणीला मारहाण केली. या प्रकारानंतर पीडित महिलेने साकिनाका पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ३०८, ११५(२) व ३५१(३) अंतर्गत बलात्कार व खंडणीचा गुन्हा दाखल केला. आरोपी जोगेश्वरी येथील रहिवासी असून तेथे जाऊन पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याचा याप्रकरणात सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
शहरात महिलांविरुद्ध आणि मुलींविरुद्धच्या घडलेल्या गुन्ह्यांमध्ये २०२४ मध्ये वाढ झाली असून गेल्यावर्षी मुंबई बलात्कार, विनयभंग आणि बालकांच्या लैंगिक अत्याचाराचे ४७८९ गुन्हे दाखल झाले आहे. २०२३ च्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. बलात्कार, विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत मुंबईत दरदिवसाला १३ गुन्ह्यांची नोंद होत आहे. मुंबई पोलिसांच्याआकडेवारीनुसार, २०२४ मध्ये मुंबईत १०५१ बलात्काराच्या घटना घडल्या तर २०२३ मध्ये ९७३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. शहरात २०२३ मध्ये २०५५ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते. त्यात २०२४ मध्ये वाढ होऊन २३९७ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दरम्यान २०२३ व २०२४ मध्ये विनयभंगाच्या गुन्ह्यांत आरोपी अटक होण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. शहरातील महिला व अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्येही वाढ झाली असून मुंबई २०२३ मध्ये महिला व अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे ११६७ गुन्हे दाखल झाले होते. २०२४ मध्ये याच काळात १२३१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.