घटस्फोट मिळण्यासाठी पोटगीपोटी बायकोने कौटुंबिक न्यायालयासमोर ठेवलेल्या यादीतील आईस्क्रिमचा खर्च देण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. आईस्क्रिमचा खर्च देण्याची अजिबात तयारी नसल्याचा न्यायालयातही त्याचा युक्तिवाद होता. मात्र, बायको त्यावर अडून बसल्याने अखेर त्याला थोडे नमते घ्यावे लागले आणि आईस्क्रिमसाठीचा खर्च म्हणून बायकोला दरमहा १५० रुपये देण्याची त्याने न्यायालयात मान्य केले… ही घटना आहे मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयातील. 
२३ वर्षांच्या संसारानंतर एका गुजराती दाम्पत्याला परस्परांपासून घटस्फोट घ्यायचा होता. मात्र, पत्नीने पोटगीपोटी मागितलेली रक्कम आणि इतर सुविधांचा खर्च देणे परवडत नसल्याचा नवऱयाचा युक्तिवाद होता. बायकोने पोटगीची अंतरिम रक्कम म्हणून एक लाख रुपये, नरिमन पॉईंटमध्ये चार खोल्यांची सदनिका, स्वतःच्या खर्चासाठी दरमहा ७५ हजार रुपये आणि मुलगा व मुलीच्या खर्चापोटी वेगळी रक्कम मागितली होती. या यादीमध्येच आईस्क्रिमचाही समावेश होता.
कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश लक्ष्मी राव यांनी अखेर अंतरिम पोटगीपोटी पत्नीला ८५ हजार रुपये देण्याचे आदेश नवऱयाला दिले. त्याचबरोबर पोटगीपोटी बायकोला २५ हजार रुपये, मुलगा आणि मुलीच्या खर्चापोटी दहा हजार रुपये आणि घरभाडे म्हणून ५० हजार रुपये दरमहा देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.