लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईः अनंत चतुर्दशीला शहरात कडेकोट बंदोबस्त असताना स्किझोफ्रेनिया आजाराने ग्रस्त महिलेने पाकिस्तानी दहशतवाद्यांबाबत खोटी माहिती देणारा दूरध्वनी मुंबई पोलिसांना केला. अनंत चतुर्दशी पूर्वसंध्येला आलेल्या या दूरध्वनीनंतर सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या. तपासणीत दूरध्वनी करणाऱ्या महिलने खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले. महिलेने २०२२ पासून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला ११० वेळा दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्याला बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एका महिलेने दूरध्वनी केला होता. मंगेश मच्छीमार हा दहशतवादी असून तो पाकिस्तानातून आला आहे.त्यानंतर तिने गोरंगाव पश्चिम येथील सिद्धार्ध नगर येथील पत्ता सांगितला. गणेशोत्सावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरूवात केली. गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक यांना याबाबत माहिती देण्यात आली. तसेच स्थानिक पोलिसांनाही याबाबतची माहिती देण्यात आली. तपासणीत आरोपीने दिलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले असून २०२२ पासून या महिलेने ११० वेळानियंत्रण कक्षालाही दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले. महिला स्किझोफ्रेनिया आजारावर घाटकोपर येथील डॉक्टरकडे उपचार घेत असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांकडून पोलिसांना मिळाली. याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

आणखी वाचा-रतन टाटांच्या माणुसकीचं पुन्हा एकदा दर्शन! ‘ही’ पोस्ट शेअर करत मदतीचं आवाहन, म्हणाले…

गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. गणेशोत्सव काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांसह, विसर्जनस्थळे, गर्दीची ठिकाणे, बाजारपेठा आणि संवेदनशिल ठिकाणी साध्या वेशातील गस्तीसोबतच सीसी टीव्ही कॅमेरे,, वॉच टॉवरच्या सहाय्याने करडी नजर ठेवली होती. ८ अतिरिक्त पोलीस आयुक्त, २५ उपायुक्त, ४५ सहाय्यक पोलीस आयुक्त, १६ हजार २५० पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. त्याच्या मदतीसाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या ३५ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्य. याशिवाय १२६ विसर्जन ठिकाणी मेटल डिटेक्टर, श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकांच्या माध्यमातूनही नियमित तपासणी करण्यात येत होती

स्किझोफ्रेनिया म्हणजे काय?

स्किझोफ्रेनिया हा एक गंभीर स्वरूपाचा मानसिक आजार असून त्यामुळे भास, भ्रम, गोंधळलेली विचार पद्धती आणि वर्तन असे परिणाम जाणवतात. अशा अवस्थेत व्यक्तीला भास झाल्यामुळे तो तेच सत्य मानून कृती करत असतो.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman with schizophrenia calls the control room more than a hundred times mumbai print news mrj