बदलापूर शहरातील रस्त्यांवरील खड्डय़ांवरून महिला सदस्यांनी बुधवारच्या महासभेत पालिका प्रशासनास धारेवर धरले. सर्वपक्षीय महिला लोकप्रतिनिधींनी या विषयावर प्रशासनावर कडाडून टीका केली. अखेर या विषयावर येत्या आठ दिवसांत विशेष सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
 नगराध्यक्षा जयश्री भोईर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत उपनगराध्यक्षा वृषाली नेने, अंकिता घोरपडे, मेधा गुरव, शीतल राऊत, स्नेहा पातकर, पुष्पा धोत्रे आदींनी या चर्चेत भाग
घेतला.   
सात कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे प्रस्ताव आज मंजुरीसाठी होते. त्यात ७० लाख रुपये खर्चून संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचाही समावेश होता. हा विषय चर्चेला येताच सर्व महिला सदस्य आक्रमक झाल्या. कारण शहरातील सर्व रस्त्यांची चाळण झालेली असताना त्यांच्या डागडुजीसाठी अवघ्या दोन ते तीन लाखांची तरतूद करण्यात आली होती. संरक्षक भिंतीचा विषय रद्द करून तो निधी रस्ते सुधारण्यासाठी द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
मालमत्ता कराच्या विषयावरही बरीच चर्चा झाली. सर्व शहराचे सर्वेक्षण करून मालमत्ता कर तसेच घनकचरा शुल्क आकारण्यात यावे, असा निर्णय या वेळी घेण्यात आला. 

Story img Loader