कल्याण डोंबिवली पालिकेतील एका कर्मचाऱ्याने एका घटस्फोटित महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला असल्याची तक्रार बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी दाखल झाली. पोलिसांनी तात्काळ त्या कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
नितीन माने असे या पालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. कल्याणमध्ये राहणारी ही महिला एका खासगी कार्यालयात नोकरी करते. या महिलेचा काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला आहे. या प्रकरणात नितीन माने याने या महिलेला आर्थिक मदत केली होती. २५ नोव्हेंबर रोजी त्याने तिला रस्त्यात अडवून ‘तू माझे पैसे परत कर, नाहीतर लग्न कर’ असे तिला धमकावले होते.  माने याने या महिलेच्या घरात घुसून पुन्हा मागील मागण्यांची री ओढून तिचा हात ओढून विनयभंग केला. मानेविरुद्ध विनयभंग, खंडणी मागणे, धमकावणे, घरात घुसण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या महिनाभरातील विनयभंगाची कल्याणमधील सातवी ते आठवी घटना आहे.
आरोपींना कोठडी
कचोरे गावात न्यू गोविंदवाडी भागातील रजनी यादव या महिलेचे घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या विठ्ठल साळवे, शाम पासगी, बलभीम चांदणे, यासिन शेख यांना कल्याण न्यायालयाने २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या भागातील झोपडीदादा नरसिंग गायसमुद्रे याने यादव कुटुंबाकडे झोपडीत राहायचे असेल तर ३० हजारांची खंडणी मागितली होती. ही मागणी पूर्ण न केल्याने व पोलीस ठाण्यात तक्रार केल्याचा राग ठेवून या चौघांनी यादव यांची झोपडी पेटून दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा