लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : रजोनिवृत्तीमुळे महिलांमध्ये नैराश्य, चिंता किंवा चिडचिड, एकाग्रता कमी होणे, झोप कमी होणे आणि स्मरणशक्तीच्या समस्या निर्माण होतात. मात्र या त्रासाबद्दल त्या बोलत नसल्याने ते कोणाच्याच लक्षात येत नाही. परिणामी, अनेक महिलांना मानसिक आजारांनाही सामोरे जावे लागते. रजोनिवृत्तीमुळे ८० टक्के महिलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रजोनिवृत्तीबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत ९१ टक्के पुरुषांनी एका सर्व्हेक्षणामध्ये व्यक्त केले आहे.
भारतीय महिलांमध्ये साधारण वयाच्या ४६ व्या वर्षी रजोनिवृत्ती येते. रजोनिवृत्तीच्या काळामध्ये त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक आयुष्याबरोबरच कामाच्या ठिकाणी आणि अन्य बाबींवर परिणाम होतो. नुकतेच एका सर्व्हेक्षणामध्ये रजोनिवृत्तीनंतर जवळपास ८० टक्के महिलांना त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यांना नैराश्य, चिंता, चिडचिड, एकाग्रता कमी होणे, झोप कमी होणे आणि स्मरणशक्तीच्या समस्यांच्या सामना करावा लागला. सर्व्हेक्षणातील सहभागी महिलांपैकी ८७ टक्के महिलांनी रजोनिवृत्तीचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर लक्षणीय परिणाम झाल्याचे सांगितले. काम करणाऱ्या सुमारे ८१ टक्के महिलांनी त्यांना रजोनिवृत्तीदरम्यान कामात एकाग्रतेचा अभाव जाणवल्याचे सांगितले. ६६ टक्के महिलांना कामाच्या ठिकाणी मूड स्विंग आणि चिडचिडेपणा जाणवला. रजोनिवृत्तीच्या काळातील बदलामुळे काम करणार्या ७३ टक्के महिलांनी वारंवार रजा घेण्याची गरज भासल्याचे सांगितले. ‘ॲबॉट’ आणि ‘इप्सोस’ या संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये अनेक महिला रजोनिवृत्तीबाबत डॉक्टरांशी संवाद साधण्यासही इच्छुक नसल्याचे आढळून आले. ९३ टक्के महिलांनी लक्षणे दिसल्यानंतर तीन महिने किंवा जास्त काळाने डॉक्टरांची भेट घेतल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे रजोनिवृत्तीमध्ये होणाऱ्या मानसिक व शारीरिकदृष्ट्या त्रासाबाबत घरातील सदस्यांसोबत बोलणे सोयीस्कर वाटत नसल्याचे मत ६६ टक्के महिलांनी व्यक्त केले.
आणखी वाचा-बेस्टच्या स्वमालकीच्या बसचा ताफा रोडावला
रजोनिवृत्तीमध्ये होणाऱ्या त्रासाबद्दल घरातील व्यक्तींसोबत चर्चा करण्यास महिलांना संकोच वाटतो. मात्र असे असले तरी याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यायला हवा, असे मत सर्व्हेक्षणात सहभागी महिलांच्या पतींपैकी ९१ टक्के जणांनी व्यक्त केले. जोपर्यंत महिला रजोनिवृत्तीच्या काळातील त्रासाबाबत स्वत:हून बोलणार नाहीत, तोपर्यंत समाजाला त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव होणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
रजोनिवृत्तीदरम्यान महिला अत्यंत कठीण आणि मोठ्या बदलांमधून जातात. त्यामुळे त्यांच्या आजुबाजूच्या लोकांनी त्यांना या टप्प्याचे व्यवस्थापन चांगल्या रितीने करण्याबाबत मदत करणे महत्त्वाचे आहे. रजोनिवृत्तीबाबत चर्चा करणे आणि विश्वासार्ह माहितीची देवाणघेवाण हे या टप्प्यात महत्त्वपूर्ण असते. -डॉ. रोहिता शेट्टी, वैद्यकीय प्रमुख, ॲबॉट