‘जन साधारण तिकीट बुकिंग सिस्टिम’ अर्थात जेटीबीएससाठी रेल्वेकडे ठेवलेली अनामत रक्कम परत मिळावी, यासाठी अनेकदा खेटे घालणाऱ्या तरुणीने अखेर गुरुवारी दुपारी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील रेल्वेच्या ‘डीआरएम’ इमारतीत आत्मदहन केले. या इमारतीतील रेल्वे सुरक्षा दलाच्या आयुक्तांच्या कार्यालयाजवळ असलेल्या प्रसाधनगृहात कोंडून घेत तिने अंगावर रॉकेल शिंपडले व स्वत:ला पेटवून दिले. या घटनेत तिचा मृत्यू झाला. मात्र तिच्या आत्महत्येमागे केवळ अनामत रक्कम परत मिळत नाही, एवढेच कारण नसून या प्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यांकडून तिचा छळही होत असल्याची कुजबूज आहे.
अनिता पटेल (२३) या तरुणीने २०११ मध्ये जेटीबीएस प्रणालीसाठी अर्ज केला होता. त्यानुसार मे २०१३ मध्ये तिला डोंबिवली येथे जेटीबीएस केंद्र सुरू करण्याचा परवाना देण्यात आला. मात्र या तरुणीला बीएसएनएलतर्फे मिळालेली जोडणी सदोष होती. त्यामुळे तिने या केंद्राची जागा बदलण्याची परवानगी मागितली. रेल्वेने ती परवानगीही दिली. मात्र या नव्या जागेतही बीएसएनएलची जोडणी सदोषच असल्याने अखेर वैतागून तिने २० नोव्हेंबर २०१३ रोजी रेल्वेकडे ही प्रणाली परत केली. तेव्हापासून आपली अनामत रक्कम परत मिळावी, यासाठी ती रेल्वे कार्यालयात खेटे घालत होती.
गुरुवारी दुपारी अनिता आपल्या कागदपत्रांची बॅग बरोबर घेऊनच रेल्वेच्या कार्यालयात आली. तिने पुन्हा एकदा अनामत रक्कम परत करण्याची मागणी केली. मात्र कोणीच दाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आरपीएफ आयुक्तांच्या कार्यालयाजवळील प्रसाधनगृहात तिने स्वत:ला कोंडून घेतले. आपल्या बॅगेतून आणलेले रॉकेल तिने अंगावर शिंपडून स्वत:ला पेटवून दिले. तिच्या किंकाळ्या ऐकू आल्यानंतर आणि धूर दिसू लागल्यानंतर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब धाव
घेतली.
पोलीस व अग्निशमन दलाला बोलवण्यात आले. त्यांनी आग विझवली, मात्र तोपर्यंत अनिता ७० टक्के भाजली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला होता.
एक जेटीबीएस केंद्र सुरू करण्यासाठी अडीच ते तीन लाख रुपयांची गुंतवणूक आहे. ही प्रणाली सुरू करण्यासाठी एक लाख रुपयाचे मशीन रेल्वेकडून घ्यावे लागते. त्यासाठी रेल्वेकडे ही रक्कम अनामत म्हणून ठेवावी लागते. अनितानेही ही रक्कम रेल्वेकडे अनामत म्हणून ठेवली होती. कागदोपत्री ही रक्कम २५ हजार एवढीच दिसत असल्याचे परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी १०० नंबरवर फोन?
अनिताने दोन दिवसांपूर्वीही या कार्यालयात येऊन आपली अनामत रक्कम परत मिळावी, यासाठी वाद घातला होता. त्यानंतर तिने पोलीस हेल्पलाइन १०० वरही फोन केला होता. पोलिसांनी तिच्या मदतीसाठी बीट मार्शल पाठवले होते. त्यांच्याकडेही तिने ही अनामत रक्कम लवकर मिळावी, याबाबत तक्रार केली होती. बीट मार्शलनी तडजोड करून ते प्रकरण तेवढय़ावरच मिटवले. केवळ २५ हजार रुपयांच्या अनामत रकमेसाठी अनिताने स्वत:ला जाळून घेतले, ही बाब न पटणारी असून रेल्वे अधिकाऱ्यांनी तिचा छळ केला का, अशी कुजबूज सुरू होती. मात्र याबाबत उपायुक्त डॉ. शिसवे यांना विचारले असता, अशी कोणतीही तक्रार आमच्याकडे अद्याप आलेली नाही, असे ते म्हणाले. पालकांनी अद्याप कोणतीही तक्रार केली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.