Devendra Fadnavis Office Vandalises: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेने गोंधळ घालत नासधूस केली. यानंतर पोलिसांनी सदर महिला कोण? याचा शोध घेतला. ही घटना गुरुवारी (दि. २६ सप्टेंबर) घडल्यानंतर आज शुक्रवारी पोलीस त्या महिलेच्या घरी पोहोचले. मात्र सदर महिलेने स्वतःला घरातच कोंडून घेतल्याचे समजते. या घटनेनंतर भाजपा माहिम विधानसभेच्या अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना सदर महिलेची पार्श्वभूमी सांगितली. “ही महिला मानसिक रुग्ण असल्याचे शेजारी सांगतात. त्यामुळेच तिचे कुटुंबिय तिला सोडून इतरत्र राहत असून ती घरी एकटीच असते. तिच्या बॅगेत नेहमी एक मोटा सुरा असतो आणि तिला सलमान खानशी लग्न करायचे आहे”, अशी माहिती तेंडुलकर यांनी दिली.

तिला मानसिक उपचारांची गरज

अक्षता तेंडुलकर म्हणाल्या, “सदर महिलेच्या वडिलांनीही तिच्याविरोधात एकदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. ती अविवाहित असून तिने घरच्यांनाही त्रास दिला होता. तिला कंटाळून सर्व कुटुंबिय वेगळे राहतात. मात्र ती मानसिक रुग्ण असून तिला उपचाराची गरज आहे. तिला या सोसायटीमधून इतरत्र हलविण्याची गरज आहे. माझ्याही कार्यालयात ती अनेकदा येऊन गोंधळ घालायची. ती सोसायटीत बांबू घेऊन फिरते. तिला सलमान खान बरोबर लग्न करायचे आहे. माझ्याकडे अनेकदा तिने सलमान खानची भेट घडवून देण्यासाठी धोशा लावला होता. आता यावर आपण काय बोलणार?”

हे वाचा >> Video: लाडक्या बहिणीने कार्यालयाची नासधूस केली का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कुणीतरी जाणीवपूर्वक…”

ती भाजपाची समर्थक, कुटुंबाला संघाची पार्श्वभूमी

अक्षता तेंडुलकर पुढे म्हणाल्या, “काही दिवसांपूर्वी माझ्या वाढदिवसाचा बॅनर तिने फाडून टाकला होता. पण तिचा कोणत्याही पक्षावर राग नाही. ती स्वतः भाजपा समर्थक आहे. ती भाजपाचे स्टेटस सोशल मीडियावर टाकत असते. तिचे बाबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते, असे म्हणतात. पण मी प्रत्यक्षात त्यांना भेटलेली नाही.”

भाजपाच्या माहिम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांनी अनेक खुलासे केले आहेत.

देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाला

या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आज ही महिला होती. पण उद्या कुणी फडणवीस यांना नुकसान पोहोचवण्यासाठी तिथे येऊ शकते. त्यामुळे याची काळजी घेतली जावी, असेही अक्षता तेंडुलकर म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिर्डी येथे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कार्यालयात नासधूस झाल्याची घटना कालची आहे. त्या महिलेचे काय म्हणणे होते, तिने हे कशाकरीता केले, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. उद्विगणतेमधून तिने हे कृत्य केले का? किंवा तिची व्यथा काय आहे? हे समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.”