काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे प्रतिपादन
महिला आणि लहान मुलांच्या उन्नतीसाठी राबवण्यात येणाऱ्या सरकारी योजना यशस्वी होण्यासाठी महिलांचे सामाजिक सक्षमीकरण होणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष व राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी ठाणे जिल्’ाातील पालघर येथे केले. मुले ही देशाचे भवितव्य असून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी अजिबात निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाहीही सोनिया गांधी यांनी यावेळी कार्यक्रमात दिली.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचा शुभारंभ सोनिया गांधी यांच्या हस्ते बुधवारी पालघरमधील स. तु. कदम विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, ‘महिला सक्षमीकरणाचा मोठा परिणाम लहान मुलींच्या आरोग्यावर होत असतो. या दृष्टीने केंद्रातील यूपीए सरकारने महिलांवरील अत्याचाराविरोधात कडक कायदा केला. याशिवाय कौटुंबिक हिंसाचार, मालमत्ता हक्क, स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण यासाठीही कायदे करण्यात आले आहेत.’  
गेली आठ वर्षे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे चांगले परिणाम दिसून आले असून देश पोलिओमुक्त झाला आहे. पल्स पोलिओ मोहिमेप्रमाणेच बालस्वास्थ्य कार्यक्रमही परिणामकारकपणे राबवावा, असे आवाहन सोनिया यांनी संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांनी केले. तब्बल १८ हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या समारंभात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री गुलाम नबी आझाद, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, पालकमंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री फौजिया खान, राजेंद्र गावित, खासदार बळीराम जाधव आदी मंत्री, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
राज्यातील जनतेला चांगल्या स्वरूपाच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी शासनाने नियोजनबद्ध आराखडा तयार केला असून नव्या रुग्णालयांनाही मान्यता देण्यात आली आहे. राजमाता जिजाऊसारख्या योजनांमुळे राज्यातील कुपोषणाचे प्रमाणही कमी झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात दिली.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या नव्या योजनेत त्यांचे एकत्रीकरण केले जाणार असून सर्व मुलांना त्याचा लाभ व्हावा यासाठी विशेष पथके निर्माण केली आहेत, अशी माहिती गुलाम नबी आझाद यांनी दिली.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सोनियाचा ‘दिनू’
डहाणू तसेच पालघर परिसरातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खऱ्या अर्थाने सोनियाचा ‘दिनू’ ठरला. विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन ३५ आदिवासी विद्यार्थ्यांनी केले. या विद्यार्थ्यांनी सोनिया गांधी यांना अतिशय आत्मविश्वासाने या ठिकाणी असलेल्या विविध आरोग्य केंद्रांची आणि तेथील उपचारांची माहिती दिली. रंगमंचावरही सूत्रसंचालन, प्रास्ताविक, पाहुण्यांचे स्वागत आणि आभारही विद्यार्थ्यांनीच मांडले. या कार्यक्रमानिमित्त परिसरातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा