प्रकाशाचे वाक्य
डेंग्यूचे निमित्त झाले आणि ‘ती’ची दृष्टी दिवसेंदिवस क्षीण होत गेली. इतकी की, तिला काहीही दिसेनासे झाले. डोळ्यांसमोर उरली फक्त एक भयाण पोकळी.. अंधाराने काठोकाठ भरलेली. तो दिवस होता ७ ऑक्टोबर, २०१४ ऑक्टोबर. दृष्टी गेली. पण, अनघा मोडक हिच्या संघर्षांला खरी धार आली. कारण, या अंधारातही तिने निग्रहाने लेखन, निवेदन हा आपला प्रवास सुरूच ठेवला. अंधाराच्या पूर्णविरामानंतरही प्रकाशाच्या वाक्याने नवी सुरुवात करू पाहणारी अनघा वेगळी ठरते ती त्यासाठीच!
रुपारेल महाविद्यालयात शिकणाऱ्या अनघाला लहानपणापासूनच लिखाणाची प्रचंड आवड. सतत कविता, संहिता, संवाद, निवेदन लिहून काढण्याची आणि त्या सादर करण्याची तिची धडपड अनेकांच्या कुतूहलाचा विषय असे. नवनवीन कला शिकण्याचा ध्यास घेऊन सतत पुढे जात राहणारी अनघा अचानक एके दिवशी डेंग्यूच्या तापाने आजारी पडली. तिच्या दृष्टीवर परिणाम झाला. पांढऱ्यावर काळ्या अक्षरांची नक्षी रेखाटण्यात रंगणाऱ्या अनघाच्या आयुष्यात फक्त काळा रंग पसरला. आयुष्य इतक्या उत्स्फूर्तपणे जगणारी एखादी व्यक्ती या आघाताने खचून गेली नसती तर नवलच. अनघाच्या प्रवासाला काळोखाने पूर्णविराम दिला. पण, या पूर्णविरामानंतरही नवे वाक्य सुरू करून आयुष्यात प्रकाश पसरविता येतो हे ती विसरली नाही. तिचा संघर्ष सुरूच राहिला. ती यातून सावरत असतानाच अनघाच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला.
अशाही परिस्थितीत प्रचंड जिद्द गाठीशी असलेल्या अनघाला जोशी सरांनी प्रवास पुन्हा सुरू करण्याची ताकद मिळवून दिली. ‘सध्या तुझा आतला प्रवास सुरू आहे. तुझी ध्यान करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकदा का आतला प्रवास झाला ही बाहेरचा प्रवास अगदी सोपा असतो,’ हा आयुष्याचा गुरुमंत्र आत्मसात करून अनघा आत्मविश्वासाने आतला आणि बाहेरचा असा दोन्हीकडचा प्रवास आत्मविश्वासाने करते आहे.
मराठी वाङ्मयात बी.ए. त्यानंतर पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदविका, छायाचित्रणाची पदविका, जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेली अनघा निवेदन करते. याच जोडीला आकाशवाणीवर रेकॉर्डिगही करते. या प्रवासात तिला अनुराधा गोरे, डॉ. अनघा मांडवकर, शोभा कुद्रे, माधवराव, कमलेश भडकमकर, विनोद पवार, महेंद्र पवार यांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले. याशिवाय आई, भाऊ, आत्या, मामा या तिच्या नातेवाईकांनीही तिचा धीर खचू दिले नाही. माणसाने नदीसारखे जगावे. सतत पुढे चालत राहावे. एका ठिकाणी थांबलो की आपले तळे होते, हे सांगायला ती विसरत नाही.
गेल्या चोवीस वर्षांपर्यंत मला सगळ्या गोष्टी पाहता येत होत्या. त्या वेळी मला अनेक रंग आवडत. विशेषत: काळा आणि पांढरा. आता काळा रंग माझ्यासोबत आहे. मात्र प्रकाशाचा रंग म्हणून ओळखला जाणारा पांढरा रंग लवकरच दिसेल याची मला खात्री आहे.
– अनघा मोडक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा