शैलजा तिवले
कुटुंबनियोजनासाठी पारंपरिक अशा नसबंदीच्या शस्त्रक्रियेच्या पद्धतीला छेद देत गर्भनिरोधक साधनांच्या वापराकडे महिलांचा कल वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या तीन वर्षांत नसबंदी करून घेणाऱ्या महिलांच्या संख्येत जवळपास ११ टक्क्यांनी घट झाली आहे.
पारंपरिक पद्धतीनुसार कुटुंब नियोजन म्हटले की महिलांसाठी नसबंदीची शस्त्रक्रिया आणि गर्भनिरोधक गोळ्या हे मोजके पर्याय उपलब्ध होते. परंतु गेल्या काही वर्षांत शस्त्रक्रियेच्या पर्यायाकडे पाठ वळवत गर्भनिरोधक साधनांच्या वापराला महिला अधिक प्राधान्य देत असल्याचे राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
जिल्हास्तरापेक्षा नगर परिषद विभागात नसबंदीचे प्रमाण घटले आहे. २०१६-१७ मध्ये नगर परिषद विभागात ९५ हजार ७६४ महिलांनी नसबंदी करून घेतली होती. २०१८-१९ मध्ये यात घट होऊन ५२ हजार २१२ नोंदले गेले. ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार, चंद्रपूर, लातूर येथील नगर परिषद विभागांमध्ये महिला नसबंदीमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाल्याची नोंद आहे.
प्रभावी गर्भनिरोधक साधनांची उपलब्धता
महिला नसबंदीच्या घटत्या प्रमाणामागे प्रभावी गर्भनिरोधक साधनांची उपलब्धता हे प्रमुख कारण आहे. अनेक पर्याय उपलब्ध असल्याने महिला नसबंदीपेक्षा साधनांच्या वापराला पसंती दर्शवत आहेत. या साधनांबाबतच जनजागृतीही मोठय़ा प्रमाणावर केली जात असून यातील अनेक साधने सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध असल्याचे आरोग्य संचलनालयाचे संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.
जोडप्यांना सोईस्कर
शस्त्रक्रिया म्हटली की रुग्णालयात दाखल होणे, भूल देणे, मूल लहान असेल तर त्याची सोय करणे अशा अनेक अडचणी असतात. गेल्या काही वर्षांत दहा वर्षे कालावधीच्या तांबी, गर्भनिरोधक गोळ्या (दर आठवडय़ाला), गर्भनिरोधक इंजेक्शन इ. प्रभावी आणि परवडणारी अशी साधने उपलब्ध झालेली आहेत. त्यामुळे साहजिकच अलीकडे ही साधने वापरणे जोडप्यांना सोईस्कर वाटते. गावांमध्ये मात्र शस्त्रक्रियेलाचा प्राधान्य दिले जात असल्याचे जे.जे. रुग्णालयाचे स्त्रीरोग विभागाचे प्रमुख डॉ. अशोक आनंद यांनी सांगितले.
आरोग्यदायी बदल
पूर्वी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या महिलेचे सरासरी वय २५ होते. परंतु अलीकडे लग्नाचे वय तिशीवर येऊन पोहचले आहे. त्यामुळे कुटुंबनियोजनाचा विचार महिला पस्तिशीला आल्यावर करते. महिलेची प्रजननक्षमता ४५ पर्यंत कार्यरत असते. त्यामुळे पुढील १० वर्षांसाठी शस्त्रक्रिया करून घेण्याचा पर्याय टाळला जातो. सुशिक्षित, मध्यम आणि उच्च वर्गातील महिला बहुतांशपणे हा पर्याय निवडत असून शस्त्रक्रियेऐवजी गर्भनिरोधक साधनांचा वापर हा आरोग्यदायी बदल आहे. जगात सर्वाधिक कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया या भारतात होतात.
– डॉ. रेखा डावर, स्त्रीरोगतज्ज्ञ, एच.एन. रिलायन्स रुग्णालय