महिलांच्या सुरक्षेला सरकारचे प्राधान्य असून, रात्रीअपरात्री प्रवास करणाऱ्या किंवा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांची सुरक्षा वाढविण्यात येणार असल्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. तसेच बलात्काराच्या घटनेनंतर विरोधकांनी केलेली राजीनाम्याची मागणी त्यांनी फेटाळून लावली आहे.
महिला छायाचित्रकारावर झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर यापुढे कोणत्याही महिला पत्रकाराला असुरक्षित ठिकाणी वृत्तसंकलनासाठी जायचे असल्यास त्यांना पोलीस संरक्षण पुरविले जाईल, असे पाटील यांनी सांगितले. त्यासाठी महिला पत्रकारांनी संबंधित पोलिसांकडे तशी मागणी करावी. या संदर्भातील परिपत्रक लगेचच काढण्यात येणार आहे. रेल्वेची सुरक्षा ही रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत असली तरी गेल्या रविवारी विदेशी महिलेला लुटण्याचा झालेला प्रकार लक्षात घेऊन राज्य पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. लेखापरीक्षकांच्या आक्षेपानंतर गृहरक्षक दलाचे जवान काढून घेण्यात आले होते. हे जवान पुन्हा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.
महिला छायाचित्रकारावर झालेल्या बलात्काराच्या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. सर्व आरोपींनी लवकरच पकडले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या गुन्ह्य़ाचा खटला जलदगती न्यायालयात चालविला जाईल. तसेच मुलीच्या कुटुंबियांकडून शिफारस केली जाईल अशी निष्णात वकिलाची नेमणूक करण्याची सरकारची तयारी असल्याचेही पाटील यांनी सांगितले. विरोधकांनी राजीनाम्याची मागणी मात्र त्यांनी फेटाळून लावली.
राजीनामा देणार नाही
महिलांच्या सुरक्षेला सरकारचे प्राधान्य असून, रात्रीअपरात्री प्रवास करणाऱ्या किंवा विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिलांची सुरक्षा वाढविण्यात येणार असल्याचे
First published on: 24-08-2013 at 06:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wont give resignation security of women to be increased