युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील एखादी व्यक्ती निवडणूक लढवत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वरळी मतदारसंघाकडे लागले आहे. वरळी मतदारसंघामधून एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. आदित्य ठाकरेंबरोबरच या मतदारसंघातून बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेही निवडणूक लढवत आहे. मात्र आता निवडणूक आयोगाने वरळी मतदारसंघातील तीन उमेदवारांना नोटीस पाठवली आहे. बिचुकलेंसहीत विश्राम पाडम आणि महेश खांडेकर यांना आयोगाने नोटीस पाठवली आहे.
लोकप्रतिनिधित्व अधिनियमअंतर्गत या तीन्ही उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी ही माहिती दिली. वरळी विधानसभा मतदारसंघातील तीन उमेदवारांनी निश्चित केलेल्या दैनिक खर्च नोंद वह्य़ा तपासणीस सादर केल्या नाहीत. त्यांच्यावर ही नोटीस बजावण्यात आली. तीन उमेदवारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम ७७ नुसार नोटिस बजावण्यात आल्या असल्याचे स्पष्ट कऱण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने पाठवलेल्या नोटीसला उमेदवारांनी वेळेत उत्तर दिले नाही तर त्यांची उमेदवारी रद्द करण्याचा अधिकार आयोगाला असतो. त्यामुळे बिचुकले, पाडम आणि खांडेकर यांना आलेल्या नोटीसला काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. बिचकुले यांनी आपण आदित्य ठाकरेंचा पराभव करु असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र आता त्यांना नोटीस आल्याने ते निवडणूक लढवणार की नाही हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.
आदित्य यांच्या विरोधात या मतदारसंघामधून मनसेने उमेदवार दिलेला नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेश माने यांना उमेदवारी दिली आहे.