मुंबई : ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मागिकेचे काम सध्या वेगात सुरू आहे. या मार्गिकेवरील दुसऱ्या टप्प्यातील भिवंडी – कल्याण दरम्यानच्या कामाला सुरुवात करण्याच्यादृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पावले उचलली आहेत. मात्र या मार्गिकेवरील महत्त्वाच्या कारशेडसाठी आवश्यक असलेली कशेळीतील जागा एमएमआरडीएच्या ताब्यात आलेली नाही. त्यामुळे या कारशेडच्या कामाला दीड – दोन महिन्यांनी सुरुवात होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> मुंबई पोलिसांना बॉम्बस्फोटाबाबत धमकीचे दोन दूरध्वनी
‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’चे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील काम सध्या सुरू असून दुसऱ्या टप्प्यातील काम अद्याप सुरू झालेले नाही. दरम्यान, इतर मेट्रो मार्गिकांप्रमाणे ‘मेट्रो ५’ च्या कारशेडचा प्रश्न रखडला आहे. या मार्गिकेचे काम सुरू असले तरी कारशेड अंधातरी होती. मात्र एमएमआरडीएने अखेर कारशेडची जागा अंतिम केली असून कशेळी येथे कारशेड उभारण्यात येणार आहे. ही कारशेड २७.१३ हेक्टर भूखंडावर उभारण्यात येणार असून हा भूखंड लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडून एमएमआरडीएला वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा >>> Mumbai Mhada Lottery: विजेत्यांना ४५ दिवसांमध्ये २५ टक्के रक्कम भरावीच लागणार
कशेळीतील जागा अद्याप ताब्यात आलेली नाही. असे असताना आता कारशेडच्या कामासाठी वन विभागाची पर्यावरणविषयक परवानगी घ्यावी लागणार आहे. ही परवानगी घेण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला असून सल्लागार नियुक्तीसाठी नुकतीच निविदा मागविण्यात आली आहे. वन परवानगी शिल्लक असल्याने कारशेडच्या कामास सुरुवात होण्यास विलंब होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. एमएमआरडीएने मात्र यामुळे कारशेडच्या कामात कोणताही अडथळा येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कारशेडमधील काही भागासाठी ही परवानगी आवश्यक आहे. एकीकडे काम सुरू होईल आणि त्यादरम्यान ही परवानगी घेतली जाईल, असेही एमएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे.