लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या गोखले पुलाची पहिली तुळई (गर्डर) रेल्वे रुळावर स्थापन केल्यानंतर ती १४ मीटर उत्तरेला सरकवण्याचे कामही पूर्ण करण्यात आले. आता ही तुळई ७.५ मीटर खाली आणण्याच्या कामाला येत्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. या कामाला साधारण दहा दिवसांचा कालावधी लागणार असून त्यानंतर त्यावर सळया अंथरून सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येईल. नियोजित वेळापत्रकानुसार कामे पार पडल्यास १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत गोखले पुलाची एक मार्गिका खुली करण्याचे लक्ष्य गाठता येणार आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार आणि पश्चिम रेल्वेने निर्देश केल्याप्रमाणे मे. राईट्स लि. यांच्या तांत्रिक पर्यवेक्षणाअंतर्गत या पुलाचे काम सुरू आहे. चर्चगेटच्या दिशेच्या मार्गिकेवर बसवलेली तुळई विरारच्या दिशेच्या मार्गिकेवर सरकवण्याचे काम २० डिसेंबरला पूर्ण झाले. त्यानंतर तुळई खाली उतरवण्याचे काम जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. हा गर्डर ७.५ मीटर खाली आणून तो पालिकेने तयार केलेल्या पोहोच रस्त्याला जोडण्यात येणार आहे. तुळई खाली आणण्यासाठीच्या पूर्वतयारीची कामे पूर्ण झाली आहेत. तुळई टप्प्याटप्प्याने खाली आणण्यात येणार आहे.
आणखी वाचा-राज्यभरातील एसटीच्या फेऱ्या बंद होण्याची शक्यता
तासाभराच्या ब्लॉकने १५ सेंटिमीटरच हालचाल
या प्रक्रियेतील सर्व टप्पे अतिशय काटेकोर आणि रेल्वे सुरक्षेच्या निकष इत्यादी बाबींमुळे कामाच्या प्रगतिपथावर मर्यादा येतात. रेल्वेच्या साधारणपणे एक तासाच्या ‘ब्लॉक’ कालावधीत तुळईफक्त १५ सेंटीमीटरनेच खाली आणता येईल. त्यामुळे गोखले पुलाच्या या अवाढव्य १, ३०० टन वजनी तुळईसाठी ७.५ मीटर खाली उतरवण्याच्या कामासाठी लागणारा कालावधी हा अधिक असू शकतो.
तुळई खाली आणून स्थापन केल्यानंतर त्यावर सळया अंथरून सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात येईल. पुलाचे क्युरींगचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर मास्टिकचे काम पूर्ण करण्यात येईल. ही सर्व कामे क्रमाने झाल्यानंतरच पूल एका दिशेच्या वाहतुकीसाठी खुला करणे शक्य होईल. आवश्यक सर्व कामांच्या पूर्ततेचा कालावधी पाहता एका दिशेची वाहतूक १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरू करणे शक्य.