मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) हाती घेण्यात आलेल्या अंधेरी ते आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा मेट्रो ७ अ मार्गिकेच्या कामाने वेग घेतला असून या मार्गिकेतील दुसऱ्या बोगद्याच्या भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दहिसर ते गुंदवली, अंधेरी पूर्व अशी मेट्रो ७ मार्गिका सध्या वाहतूक सेवेत रुजू आहे. या मार्गिकेचा अंधेरी पूर्व ते आंतरराष्ट्रीय विमानतळ असा विस्तार मेट्रो ७ अ मार्गिकेद्वारे करण्यात येत आहे. ३.४४२ किमी लांबीच्या या मार्गिकेतील २.४९ किमी लांबीच्या दुहेरी भुयारी मार्गाच्या (बोगदा) कामाला १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे.

हेही वाचा – सूतगिरण्यांच्या कर्जाचा सरकारवर वाढता भार; १,३५१ कोटी रुपये थकीत व्याज

टी ६२ टीबीएम (टनल बोरिंग मशीन) यंत्राच्या साहाय्याने हे काम सुरू असून या बोगद्याच्या भुयारीकरणाचे प्रारंभिक काम पूर्ण झाले. आता दुसऱ्या बोगद्याच्या भुयारीकरणाच्या कामास एमएमआरडीएकडून नुकतीच सुरुवात झाली आहे. ६० टीबीएम यंत्राच्या मदतीने भुयारीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. भुयारीकरणाचे प्रारंभिक काम महिन्याभरात पूर्ण होणार आहे. या दोन्ही बोगद्यांच्या भुयारीकरणाचे काम मे २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. ही मार्गिका पूर्ण झाल्यास अंधेरी ते आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवास अवघ्या काही मिनिटांत पार करणे शक्य होईल.

हेही वाचा – अध्यक्षपद रिक्तच ;‘एमपीएससी’ला अद्याप सेठ यांची प्रतीक्षा

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीही दूर होईल. मात्र त्याचवेळी या मार्गिकेमुळे भविष्यात मुंबईच्या कोणत्याही कोपऱ्यातून आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचणे सहज सोपे होणार आहे. कारण ही मार्गिका अन्य मेट्रो मार्गिकांशी जोडली जाणार आहे. उत्तन-भाईंदर-मिरारोड ते दहिसर मेट्रो ९, दहिसर ते गुंदवली मेट्रो ७, कुलाबा-वांद्रे-सीपझ मेट्रो ३ मार्गिकेला जोडली जाणार आहे. त्यामुळे अगदी कुलाब्यावरून, उत्तनवरून विमानतळाला पोहोचणे सोपे होणार आहे. त्यामुळे ही मेट्रो ७ अ मार्गिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work of second tunnel of metro 7a route has started mumbai print news ssb
Show comments