निती आयोगाची मान्यता मिळूनही केंद्रीय मंत्रिमंडळाची मोहोर नाही

गेल्या रेल्वे अर्थसंकल्पातील अनेक घोषणा पूर्ण झाल्याचा ढोल रेल्वे मंत्रालयातर्फे बडवण्यात येत असला, तरी मुंबईकरांसाठी महत्त्वाचा ‘एमयूटीपी-३’ प्रकल्प अद्यापही कागदावरच आहे. ११ हजार कोटी रुपयांची ही योजना गेल्या वर्षी जाहीर झाली. या योजनेसाठीच्या निधीला निती आयोगाने काही महिन्यांपूर्वीच मान्यता दिली असली तरी त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाची मोहोर उमटणे बाकी आहे. त्यामुळे घोषणा होऊन वर्ष सरत आले, तरी या योजनेतील एकाही कामाला सुरुवात झालेली नाही.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मुंबईकरांचा ‘अनुशेष’ भरून काढण्यासाठी गेल्या वर्षी ११,४०० कोटी रुपयांच्या एमयूटीपी-३ची घोषणा रेल्वे अर्थसंकल्पादरम्यान केली. मुंबईतील बदलत्या परिस्थितीनुसार काही नवे मार्ग, सध्या असलेल्या मार्गाची क्षमता वाढविण्याचे प्रकल्प आदी गोष्टी एमयूटीपी-३ योजनेत आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात घोषणा झाल्यानंतर मे महिन्यापासून तरी या योजनेतील काही प्रकल्पांचे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप या योजनेतील एकाही प्रकल्पाला गती मिळालेली नाही.

वास्तविक एमयूटीपी-२ या योजनेतील काही प्रकल्प पूर्ण होण्यास अजूनही दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. यात दिवा-ठाणे दरम्यान पाचवी-सहावी मार्गिका, सीएसटी-कुर्ला यादरम्यान पाचवी-सहावी मार्गिका, हार्बर मार्गाचा गोरेगावपर्यंत विस्तार या प्रकल्पांचा समावेश आहे. विविध कारणांमुळे हे प्रकल्प अजूनही अपूर्णावस्थेतच आहेत. त्यातच येत्या रेल्वे अर्थसंकल्पातही सुरेश प्रभू मुंबईकरांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र याआधीच केलेल्या घोषणा प्रत्यक्षात येण्याआधीच नव्या घोषणा करून काय साध्य होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वेध रेल्वे अर्थसंकल्पाचे

एमयूटीपी-३ महत्त्वाचे प्रकल्प व अंदाजे खर्च

  • पनवेल-कर्जत मार्गाचे दुपदरीकरण – २१३९ कोटी
  • विरार-डहाणू रोड

मार्गावर तिसरी व चौथी मार्गिका – ३५२२ कोटी

  • ऐरोली-कळवा उन्नत

मार्गिका – ४२९ कोटी

  • ठाणे-भिवंडी उपनगरीय रेल्वेमार्ग – १००० कोटी
  • वसई-विरार-पनवेल उपनगरीय मार्ग – ५५७३ कोटी

एमयूटीपी-३ साठी पैसे आलेले नाहीत. एमयूटीपी-२ची कामे जोरात सुरू आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून निधीला मंजुरी मिळाली की एमयूटीपी-३चे काम सुरू होईल.

– प्रभात सहाय, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण

Story img Loader