लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : प्रवाशांचा प्रवास अधिक गतिमान व्हावा यासाठी पनवेल – कर्जतदरम्यान रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले असून या मार्गात तीन बोगद्यांचा समावेश आहे. मुंबई महानगरातील सर्वात मोठ्या बोगद्याचे काम सध्या या मार्गावर सुरू आहे. एकूण २.६ किमीपैकी एक किमी लांबीच्या बोगद्याचे काम नुकताच पूर्ण झाले.

अन्य राज्यांतून मोठ्या संख्येने नागरित मुंबई महानगरात दाखल होत आहेत. परिणामी, मुंबई महानगरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येत आहे. परिणामी, नेरुळ – खारकोपर – उरण हा चौथा उपनगरीय, पनवेल – कर्जत थेट लोकल आणि इतर रेल्वे मार्गिकांच्या विस्ताराचे काम सुरू आहे. सध्या पनवेल – कर्जतदरम्यान एकच मार्ग असल्याने मेल, एक्स्प्रेस आणि मालगाड्या याच मार्गावरून धावतात. पनवेल – कर्जत लोकल मार्ग तयार झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकेल. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प-३ (एमयूटीपी-३) अंतर्गत पनवेल – कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. या रेल्वे मार्गावर नढाल, किरवली आणि वावर्ले येथे एकूण ३,१४४ मीटर लांबीच्या तीन बोगद्यांची कामे सुरू आहेत. यापैकी वावर्ले येथील बोगदा २,६२५ मीटर लांबीचा असून हा बोगदा पूर्ण झाल्यास मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. तसेच नढाल येथील बोगद्याची लांबी २१९ मीटर, तर किरवली येथील बोगद्याची लांबी ३०० मीटर आहे.

आणखी वाचा-मुंबई : मध्य रेल्वेच्या ‘शुन्य भंगार’ मोहिमेला गती

नढाल बोगद्याचे खोदकाम ऑक्टोबर २०२२ रोजी सुरू झाले आणि मे २०२३ पर्यंत पूर्ण झाले. सध्या बोगद्याचे जलरोधकीकरण आणि सिमेंट-काँक्रिटीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. फेब्रुवारी २०२३ पासून वावर्ले बोगद्याचे काम सुरू करण्यात आले असून ६ सप्टेंबर २०२३ पर्यंत १,००२ मीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे. खडक आणि दरड कोसळू नये म्हणून मजबूत जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. बोगदा नियंत्रण प्रणाली, प्रकाश व्यवस्था आणि वायुवीजन प्रणालीचे काम सुरू आहे.

सध्या मुंबई महानगरात ठाणे – दिवा रेल्वे मार्गावरील पारसिक बोगदा उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वात मोठा बोगदा समजला जातो. मात्र या बोगद्यापेक्षा मोठा बोगदा पनवेल – कर्जतदरम्यानच्या रेल्वे मार्गावरील वावर्ले परिसरात आकाराला येत आहे. या बोगद्याची लांबी २.६० किमी इतकी आहे, अशी माहिती एमआरव्हीसीकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Work on one of the three tunnels on the panvel karjat railway line has been speeded up mumbai print news mrj