मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी-३) अंतर्गत पनवेल – कर्जत दुहेरी रेल्वे मार्गाचे काम हाती घेतले आहे. आजघडीला या रेल्वेमार्गाचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील ९ महिन्यात या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य एमआरव्हीसीने ठेवले आहे. सध्या रेल्वे मार्गाची कामे वेगात सुरू असून मोहापे – चिखलेदरम्यान रेल्वे रूळ मार्ग जोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर, येत्या काही दिवसात कर्जत – चौक दरम्यानचे काम हाती घेण्यात येणार आहे.

मुंबई महानगरातील रेल्वे सेवेवरील वाढलेला गर्दीचा ताण पनवेल-कर्जत रेल्वेमार्गामुळे विभाजित करण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाला २०१८ साली मंजुरी मिळाली. त्यानंतर या प्रकल्पाच्या पायाभूत कामांवर भर दिला जात आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली ५६.८२ हेक्टर खासगी जमीन आणि ४.४ हेक्टर सरकारी जमीन संपादित करण्यात आली आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण ९.१३ हेक्टर वन जमिनीच्या हस्तांतराला मंजुरी मिळाली आहे. यात सरकारी आणि खासगी वन जमिनीचा समावेश आहे.

आजघडीला मोठ्या आणि लहान पुलांचे बांधकाम सुरू आहे. उड्डाणपूल, पादचारी पूल व अतिरिक्त पुलाचे काम सुरू आहे. मोहापे – चिखलेस्थानकांदरम्यान ७.८ किमी लांबीचा रेल्वेमार्ग तयार करण्यात आला आहे. सध्या या मार्गावर ईयूआर रेकची वाहतूक होत आहे. येथील कामे पूर्ण झाल्यावर कर्जत – चौक स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गाची जोडणी सुरू होणार आहे. यासह पुणे एक्स्प्रेस वे येथील भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. मोहापे आणि किरवली येथील प्रमुख ४ उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. पनवेल – कर्जत मार्गावर पाच स्थानके उभारण्यात येणार आहेत. पनवेल, चौक, मोहापे, चिखले, कर्जत अशी स्थानके असतील. या स्थानक बांधणीचे कंत्राट देण्यात आले आहे. पनवेल स्थानकावर स्थानक इमारत, कर्मचारी निवास्थान, ओव्हरहेड वायर साधनांचे आगार व पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम सुरू आहे. तसेच फलाट, पादचारी पूल यांचे नियोजन करण्यात येत आहे.

पनवेल – कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होईल. तसेच मुंबईला जोडण्यासाठी आणखी एक मार्ग तयार होईल. पनवेल आणि कर्जतला जोडणारा महत्त्वाचा दुवा तयार होईल. ज्यामुळे उपनगरीय प्रवाशांना आणि मालवाहतुकीसाठी दोन्ही प्रकारे फायदा होईल, अशी माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळातर्फे (एमआरव्हीसी) देण्यात आली.

Story img Loader