लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावाच्या पायऱ्या बसवताना दर्जा राखला जात नसल्याचा आरोप स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी केल्यानंतर आता पालिकेने याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तलावाच्या पायऱ्या जतन करण्याचे काम आचारसंहितेनंतरच हाती घेतले जाणार आहेत. सध्या केवळ पायऱ्यांची तात्पुरती डागडुजी केली जात असल्याचे मुंबई महापालिकेचे म्हणणे आहे.
मुंबई महानगरपालिकेने बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे तलावाच्या पायऱ्या, पायऱ्यांचे दगड, दीपस्तंभांची दूरवस्था झाली होती. तसेच तलाव परिसरात पायऱ्यांवरील बांधकामे झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महानगरपालिकेने बाणगंगा तलाव व परिसराच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. मात्र आधीच्या कंत्राटदाराने तलावातील गाळ काढताना पायऱ्यांचे नुकसान केले होते. त्यामुळे कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता व त्याचे कंत्राटही रद्द करण्यात आले होते. त्यानंतर पालिकेने नव्याने निविदा काढण्याचे ठरवले होते. तेव्हापासून बाणगंगा तलावाचे काम ठप्प झाले होते. मात्र या तलावाच्या पायऱ्यांची डागडुजी करतानाची एक ध्वनीचित्रफित समाजमाध्यमांवर फिरत होती. त्यात या तलावाच्या पायऱ्या बसवण्यासाठी विटांचा चुरा वापरण्यात येत असल्याचे दिसत होते. त्यामुळे या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
आणखी वाचा-वरळी बीडीडीतील ३५ हून अधिक चाळींतील रहिवासी मतदान करणार, मतदानावरील बहिष्काराचा निर्णय अखेर मागे
दरम्यान, दरवर्षीप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त १५ नोव्हेंबर २०२४ रोजी बाणगंगा महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पाच ते सहा हजार भाविक येतात. त्यामुळे या पुरातन पायऱ्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक (मलबार हिल पोलीस ठाणे) यांनी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी पालिका प्रशासनाला कळविले होते. मोठ्या संख्येने येणाऱ्या जमावाची गैरसोय टाळण्यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने पायऱ्यांचे हलणारे दगड त्याच ठिकाणी घट्ट बसविण्यात आले होते, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर, निविदा प्रक्रिया पूर्ण करून, राज्य सरकारच्या पुरातत्व व वस्तूसंग्रहालये विभागाच्या सूचीबद्ध कंत्राटदाराच्या माध्यमातून बाणगंगा पुरातन तलावाच्या दुरुस्तीचे काम पार पाडण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.