मुंबई : ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेच्या दुसऱ्या टप्प्यातील भिवंडी – कल्याणदरम्यानच्या कामाला येत्या चार महिन्यांत सुरुवात होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या टप्प्याच्या कामासाठी नुकतीच निविदा जारी केली आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुढील चार महिन्यांत कामाला सुरुवात करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

ठाणे – कल्याण अंतर कमी करण्यासाठी, तसेच ही शहरे मेट्रोने जोडण्यासाठी एमएमआरडीएने ठाणे – भिवंडी – कल्याणदरम्यान २४.९ किमी लांबीची मार्गिका उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ८४१६.५१ कोटी रुपये खर्चाच्या या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील ठाणे – भिवंडीदरम्यानचे काम सध्या सुरू असून या टप्प्यातील ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. तर मार्गिकेतील कारडेपोचा प्रश्नही एमएमआरडीएने मार्गी लावला आहे. त्यामुळेच आता एमएमआरडीएने ‘मेट्रो ५’च्या दुसऱ्या टप्प्यातील भिवंडी – कल्याणदरम्यानच्या कामासाठी निविदा जारी केली आहे.

निविदा सादर करण्याची मुदत ८ मे आहे. ही निविदा प्रकिया पूर्ण करून येत्या चार महिन्यांत दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.

Story img Loader