लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत सध्या पहिल्या टप्प्यातील पाच पुनर्वसित इमारतींचे काम वेगात सुरू असून म्हाडाच्या मुंबई मंडळाने नुकतेच विक्री घटकातील १८०० घरांच्या कामालाही सुरुवात केली आहे. तर आता मुंबई मंडळाने दुसऱ्या टप्प्यातील कामालाही सुरुवात केली आहे. त्यानुसार सध्या येथील पाच चाळी रिकाम्या करण्याच्या कामास सुरुवात झाली असून येत्या १५ दिवसात चाळींच्या पाडकाम सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर या जागी तीन पुनर्वसित इमारतीच्या बांधकामास सुरुवात केली जाणार आहे.

नायगावमधील ६.४५ हेक्टर जागेवरील ४२ चाळींचा म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यात येत आहे. या पुनर्विकासाअंतर्गत ३३४४ रहिवाशांसाठी २३ मजली २० पुनर्वसन इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील आठ पुनर्वसित इमारतींचे काम प्रगतीपथावर आहे. या पहिल्या टप्प्याअंतर्गत १४९५ घरांचे बांधकाम केले जात असून हे काम डिसेंबर २०२५ अखेर पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे डिसेंबर २०२५ अखेर वा जानेवारी २०२६ मध्ये १४९५ घरांचा ताबा दिला जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास १४९५ बीडीडीवासियांचे उत्तुंग इमारतीत ५०० चौरस फुटांच्या घरात वास्तव्यास जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

पहिल्या टप्प्याचे काम वेगात सुरू असतानाच काही महिन्यांपूर्वीच मंडळाने नायगाव पुनर्विकासाअंतर्गत विक्री घटकातील इमारतींच्या कामालाही सुरुवात केली आहे. ६५ मजली तीन आणि ४१ मजली एक अशा एकूण चार इमारती विक्री घटकांअंतर्गत बांधण्यात येत असून या इमारतीत १८०० घरांचा समावेश आहे. या घरांची विक्री बाजारभावाने विनासोडत केली जाण्याची शक्यता आहे. मात्र या घरांच्या विक्रीसाठी २०२९ उजाडण्याची शक्यता आहे. या घरांचे काम २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे मंडळाचे नियोजन आहे.

एकूणच मंडळाने पहिल्या टप्प्यासह विक्री घटकातील कामाला वेग दिला असताना आता पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यालाही नुकतीच सुरुवात केल्याची माहिती मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यात १२ पुनर्वसित इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. १२ इमारतींपैकी लवकरच तीन पुनर्वसित इमारतींच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी येथील पाच चाळी रिकाम्या करण्याचे काम सध्या सुरू असून हे काम आठवड्याभरात पूर्ण होईल. त्यामुळे येत्या १५ दिवसांत या चाळींचे पाडकाम करण्याचे नियोजन असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. पाडकाम झाल्यानंतर तीन पुनर्वसित इरमातींच्या, तर त्यानंतर उर्वरित इमारतींच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.