मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, पुणे वर्तुळाकार रस्ता आणि नांदेड-जालना द्रुतगती महामार्ग अशा तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या आर्थिक निविदा उघडण्यास काहीसा विलंब होणार आहे. आता ५ एप्रिलला निविदा उघडण्यात येणार असून त्यानंतर कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तिन्ही प्रकल्पासाठी २६ टप्प्यांत २६ कंत्राटदारांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच या तिन्ही प्रकल्पाच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच विरार-अलिबाग अंतर कमी करण्यासाठी विरार-अलिबागदरम्यान १२८ किमी लांबीची बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका बांधण्यात येणार आहे. मुंबई – नागपूर अशा ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचा विस्तार जालना – नांदेडपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठी एमएसआरडीसीने १९० किलोमीटर लांबीचा जालना – नांदेड महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुणे रिंग रोड अर्थात पुणे वर्तुळाकार रस्ता बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे तिन्ही प्रकल्प राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून ते प्रत्यक्ष मार्गी लावण्यासाठी एमएसआरडीसीने वर्षभरापूर्वी या प्रकल्पांच्या बांधकामासाठी एकत्रित २६ टप्प्यांमध्ये स्वारस्य निविदा मागविल्या होत्या. पुणे वर्तुळाकार रस्त्यासाठी नऊ टप्प्यांत, बहुउद्देशीय मार्गिकेसाठी अकरा टप्प्यांत आणि नांदेड-जालनासाठी सहा टप्प्यांत निविदा मागविण्यात आल्या होत्या.
हेही वाचा – शिंदे गटाचे खासदार माने – मंडलिक यांच्यासाठी संघर्ष कायम
एमएसआरडीसीच्या स्वारस्य निविदेला २८ कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. त्यातील १८ निविदा पात्र ठरल्या असून या पात्र निविदाकारांकडून आर्थिक निविदा मागविण्यात आल्या. त्यानुसार आर्थिक निविदा खुल्या करत मार्चपर्यंत निविदा अंतिम करत कामास सुरुवात करण्याचे नियोजन एमएसआरडीसीचे होते. मात्र या निविदा खुल्या करण्यास काहीसा विलंब झाला आहे. आता ५ एप्रिलला निविदा खुल्या करत त्यानंतर कंत्राट अंतिम करण्यात येणार आहे. त्यानंतर कंत्राटदारांना देकार पत्र देत कामास सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे. एकूणच आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर अर्थात जूननंतर या तिन्ही प्रकल्पाच्या कामास सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तेव्हा आता या तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या निविदेत कोण बाजी मारते हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा – सोलापूर : माढ्यात भाजपचा उमेदवार बदलण्यासाठी शिवसेनेचाही दबाव
पात्र ठरलेल्या १८ निविदाकारांमध्ये एल अँड टी, अॅपको इन्फ्राटेक, मेघा इंजिनियरिंग, एनसीसी, पटेल इन्फ्रा, अॅफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर, पीएनसी इन्फ्रास्ट्रक्चर, नवयुग इंजिनियरिंग कंपनी अशा नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. तर यातील अनेक कंपन्यांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम केले आहे. निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यापैकी दुसऱ्या क्रमांकाच्या मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीही या स्पर्धेत आहे. समृद्धी महामार्गाच्या दोन टप्प्यांचे कामही या कंपनीने केले आहे.