मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) विरार – अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसह जालना – नांदेड समृद्धी मार्ग (विस्तारीत मार्ग) आणि पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्पासाठी एकत्रित २६ टप्प्यांमध्ये स्वारस्य निविदा मागविल्या होत्या. या निविदेला २८ कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून आता ऑक्टोबर अखेरीस प्रत्यक्ष बांधकामासाठी आर्थिक निविदा मागविण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला आहे. स्वारस्य निविदा सादर केलेल्या कंपन्यांमधूनच पात्र कंपनीला कंत्राट दिले जाणार आहे. तर डिसेंबरपर्यंत कंत्राट अंतिम करून नव्या वर्षाच्या सुरुवातीला या तिन्ही प्रकल्पांच्या कामाला सुरुवात करण्याचा एमएसआरडीसीचा मानस आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच जलद प्रवासासाठी विरार-अलिबागदरम्यान १२८ किमी लांबीची बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका बांधण्यात येणार आहे. तर मुंबई – नागपूर दरम्यानच्या ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचा विस्तार जालना – नांदेडपर्यंत करण्यात येणार आहे. यासाठी एमएसआरडीसीने १९० किलोमीटर लांबीचा जालना – नांदेड महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्याचवेळी पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुणे रिंग रोड अर्थात पुणे वर्तुळाकार रस्ता बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी १३६ किमी लांबीचा रस्ता बांधण्यात येणार आहे. हे तिन्ही प्रकल्प राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अंत्यत महत्त्वाचे मानले जात असून हे तिन्ही प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएसआरडीसीने एप्रिलमध्ये एकत्रित २६ टप्प्यांमध्ये स्वारस्य निविदा मागविल्या होत्या. १२८ किमी लांबीच्या बहुउद्देशीय मार्गिकेतील ९६.४१ किमी लांबीच्या मार्गिकेच्या बांधकामासाठी ११ टप्प्यांत निविदा मागविण्यात आल्या होत्या. तर नांदेड – जालना महामार्गासाठी पाच टप्प्यांत आणि पुणे वर्तुळाकार रस्त्यासाठी नऊ टप्प्यांमध्ये स्वारस्य निविदा मागविल्या होत्या. तर प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नियुक्त करण्याच्या अनुषंगाने या निविदा जारी करण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला असून २८ कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. एल ॲण्ड टी, ॲपको इन्फ्राटेक, मेघा इंजिनिअरिंग, एनसीसी, पटेल इन्फ्रा, ॲफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर, पीएनसी इन्फ्रास्ट्रक्चर, नवयुग इंजिनिअरिंग कंपनी, आयआरबी अशा बड्या कंपन्यांचा यात समावेश आहे.
तीन प्रकल्पांसाठी सादर झालेल्या निविदांची छाननी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आता एमएसआरडीसीकडून आर्थिक निविदा मागविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यानुसार ऑक्टोबर अखेरीस आर्थिक निविदा मागविण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. तर डिसेंबरअखेर निविदा अंतिम करून नव्या वर्षात कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
भूसंपादन वेगात
एकिकडे या तिन्ही प्रकल्पांच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे भूसंपादन प्रक्रियेनेही वेग घेतला आहे. शक्य तितक्या लवकर भूसंपादन मार्गी लावण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. नव्या वर्षात काम सुरू करण्याच्या अनुषंगाने भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण केले जाणार आहे.