मुंबई : सागरी किनारा मार्गालगत वरळी समुद्रकिनारा परिसरात दोन भूमिगत वाहनतळ बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक वाहनतळात १९६ गाड्या उभ्या करण्याची क्षमता असून या वाहनतळाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. या भूमिगत वाहनतळाचा उद्वाहनाचा (लिफ्ट) भाग जमिनीवर असून जमिनीखाली दोन मजले वाहनतळ उभारण्यात आले आहे.
सागरी किनारा मार्ग प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल – वांद्रे – वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत असा १०.५८ किलोमीटर लांबीचा आहे. सध्या या प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी समुद्रात भराव टाकून जमीन तयार करण्यात आली आहे. या भराव जमिनीपैकी सुमारे २५ ते ३० टक्के क्षेत्रात सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. तर उर्वरित ७० ते ७५ टक्के जागेत म्हणजेच ५३ हेक्टर जागेत हरित क्षेत्र व नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत. ज्यामध्ये प्रसाधनगृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल मार्गिका, फुलपाखरू उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमिगत पदपथ, जेट्टी इत्यादींचा समावेश असणार आहे. याव्यतिरिक्त वरळी, हाजीअली या ठिकाणी भूमिगत वाहनतळे उभारण्यात येणार आहेत. या वाहनतळांची क्षमता १ हजार ८५६ वाहने राहतील एवढी असणार आहे. त्यापैकी वरळी सीफेस येथे वरळी दूध डेअरीजवळ दोन भूमिगत वाहनतळे उभारण्यात येणार असून त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
वरळीच्या वाहनतळात काय ?
सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले असताना पालिका प्रशासनाने आता भराव जमिनीवर इतर सुविधा देण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात भूमिगत वाहनतळांच्या बांधकामालाही पालिकेने सुरूवात केली. त्यापैकी वरळी येथील वाहनतळाचे काम पूर्ण होत आले आहे. या ठिकाणी दोन वाहनतळे उभारण्यात येणार असून प्रत्येक वाहनतळाची क्षमता १९६ गाड्या उभ्या करण्याची आहे. या वाहनतळात आत जाण्यासाठी गाड्या व माणसांकरीता उद्वाहन आणि पायऱ्यांची सोय करण्यात आली आहे.
ब्रीच कॅण्डीच्या जागेवर काय होणार ?
सागरी किनारा मार्गालगत ब्रीच कॅण्डी येथील अमरसन्स उद्यानाजवळ एक वाहनतळ होणार होते. त्याकरीता खोदकामही पूर्ण झाले होते. मात्र ब्रीच कॅण्डी येथील रहिवाशांनी या वाहनतळाला विरोध केल्यामुळे हा प्रकल्प पालिका प्रशासनाने गुंडाळला. मात्र या जागेचा वापर दुसऱ्या कोणत्या कारणासाठी करावा याबाबत पालिका प्रशासन चाचपणी करीत आहे. या जागेवर अग्निशमन केंद्र उभारण्याबाबतही चाचपणी सुरू होती. मात्र जागेचा दुसरा वापर करण्यासाठी (चेंज ऑफ यूज) प्रस्ताव तयार करावा लागणार असल्याची माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.