नव्या वर्षात मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या विरार-अलिबाग बहुउद्देशीय महामार्गिकेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. १२८ किमी लांबीच्या या महामार्गिकेचे टप्प्याटप्प्याने काम करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील मोरबे – करंजाडे या २० किमी लांबीच्या मार्गिकेच्या कामाला येत्या सहा महिन्यात सुरुवात करण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीए) केले आहे.
हेही वाचा- मुंबई : समुद्र दूषित करणाऱ्या नाल्यांचे प्रवाह वळवणार; महानगरपालिका तयार करणार सविस्तर प्रकल्प अहवाल
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच विरार – अलिबाग अंतर कमी करण्यासाठी हाती घेण्यात आलेला हा प्रकल्प १३ वर्षांहून अधिक काळ रखडला आहे. आता मात्र हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एमएसआरडीसीने कंबर कसली आहे. या प्रकल्पासाठी लागणारा निधी उभारण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याच्यादृष्टीने एमएसआरडीसीने तयारी सुरू केली आहे. नवीन वर्षात हा प्रकल्प प्राधान्याने सुरू करण्यात येईल, अशी माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. १२८ किमी लांबीचा हा प्रकल्प असून यात मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादनाचे मोठे आव्हान एमएसआरडीसाला पेलावे लागणार आहे. तसेच भूसंपादनास बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर एमएसआरडीसीने टप्प्याटप्प्याने भूसंपादन आणि बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा- मुंबई: म्हाडाच्या घरांसाठी एकच नोंदणी सेवा गुरुवारपासून; कोणत्याही सोडतीसाठी अर्ज करण्याची सुविधा
या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात मोरबे – करंजाडे असा २० किमी लांबीच्या मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या मार्गातील भूसंपादन पूर्ण करून येत्या सहा महिन्यात कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या सहा महिन्यांत हुडकोच्या माध्यमातून कर्ज उभारणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. एकूणच हा प्रकल्प मुंबई आणि एमएमआरच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.