महाराष्ट्रातील आठ प्राचीन मंदिरांच्या जतन-संवर्धन आणि परिसर विकास कार्यक्रमांतर्गत नोव्हेंबरपासून खंडोबा मंदिर, पुरुषोत्तम मंदिर आणि धूतपापेश्वर या तीन मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामाला नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.या कामासाठीच्या निविदा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) अंतिम केल्या असून त्या मंजूरीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. ही मंजुरी घेऊन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कार्यादेश देण्यात येणार आहेत. त्यानंतर तात्काळ कामास सुरुवात करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने प्राचीन मंदिरे असून काळाच्या ओघात या मंदिरांची दुरवस्था झाली आहे.
हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?
प्राचीन मंदिरांच्या जतन-संवर्धनासह मंदिर परिसराचा विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यासाठी २०२१ मध्ये अर्थसंकल्पात १०१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. राज्यात रस्ते विकासाचे काम करणाऱ्या एमएसआरडीसीकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी स्वीकारून एमएसआरडीसीने पहिल्या टप्प्यात आठ मंदिरांचे जतन-संवर्धन आणि दुसऱ्या टप्प्यात परिसर विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिकमधील गोंदेश्वर, कार्ला येथील एकवीरा, औरंगाबादमधील खंडोबा , गडचिरोलीमधील शिवमंदिर मार्कंडा, माजलगाव (बीड)मधील भगवान पुरुषोत्तम मंदिर, कोल्हापूरमधील कोपेश्वर, अमरावतीमधील आनंदेश्वर शिवमंदिर आणि राजापूर (रत्नागिरी)मधील धूतपापेश्वर या आठ मंदिरांचा सविस्तर विकास आराखडा चार सल्लागारांच्या माध्यमातून तयार करून घेत त्याला मंजूरीही घेतली आहे.
या मंजुरीनंतर निविदा काढून आठही मंदिरांच्या कामाला सुरुवात करण्यात येणार होती. मात्र ऑगस्टमध्ये खंडोबा मंदिर, पुरुषोत्तम मंदिर आणि धूतपापेश्वर या तीन मंदिरांच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी निविदा काढण्यात आल्या. उर्वरित गोंदेश्वर मंदिर, एकविरा मंदिर, शिव मंदिर मार्कंडा, कोपेश्वर मंदिर आणि आनंदेश्वर शिवमंदिर ही पाच मंदिरे भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून त्यांनी कामास मंजुरी न दिल्याने त्यासाठी निविदा काढण्यात आलेल्या नाहीत.
हेही वाचा : मुंबई पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन गणवेशाचा पुरवठा सुरू
या तीन मंदिरांच्या कामासाठी ऑगस्टमध्ये काढण्यात आलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला असून निविदा अंतिम करण्यात आल्या आहेत. लवकरच निविदेला मंजुरी घेण्यात येणार असल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कार्यादेश काढून तात्काळ पहिल्या टप्प्यातील मंदिरांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. काम सुरू झाल्यापासून दोन वर्षात अर्थात २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. हे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मंदिर परिसर विकासाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.