लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : मुंबई महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत असलेल्या दोन हजार आशा सेविकांनी मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकाअंतर्गत कार्यरत सर्व आशा सेविकांना सहा हजार रुपये वेतन देण्यात यावा, त्यांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपूर्वी देण्यात यावे, महानगरपालिकेतील सेवानिवृत्त आरोग्यसेविकांच्या रिक्त जागेवर आशासेविकांना आरोग्यसेविका म्हणून नियुक्त करावे. त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेविका यांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे २०१५ पासून किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी व निवृत्तीवेतन, प्रसूती विषयी फायदे, गटविमा योजना लागू करावी किंवा १५ हजार रुपये वार्षिक विम्याचा हप्ता द्यावा, ज्या आरोग्य सेविकांना सर्वेक्षणाचे काम शक्य नाही. त्यांना ते देण्यात येऊ नये. तसेच संघटनेशी करार केल्याशिवाय कोणतेही मानधन असलेले अतिरिक्त काम लादू नये, अतिरिक्त कामासाठी किमान वेतन अधिनियमातील तरतुदीनुसार अतिकालिक भत्याच्या आधारे म्हणजे दुपट्टीने मोबदला देण्यात यावा, अशा मागण्या आशा सेविकांनी केल्या आहेत. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेतील चार हजार आरोग्य सेविका व दोन हजार आशा सेविकांनी मंगळवारी (११ जून) काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
आणखी वाचा-मुंबई : पर्यटन हौस महागात, व्यावसायिकाची पाच कोटींची फसवणूक
चार हजार आरोग्य सेविका व दोन हजार आशा सेविका आझाद मैदानावर जमणार आहेत. या आंदोलनानंतरही मागण्या मान्य न झाल्यास मुंबईच्या रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. चार हजार आरोग्य सेविका व दोन हजार आशा सेविका यांची नुकतीच एक सभा झाली. त्यात प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या काम बंद आंदोलनामुळे नागरिकांना आरोग्य सेवा मिळाली नाही तर त्याला मुंबई महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, असे महापालिका आरोग्य सेवा कर्मचारी संघटना आणि म्युनिसिपल आशा सेविका युनियनचे अध्यक्ष ॲड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.