चेंबूर-वडाळा-संत गाडगेबाबा चौक या मार्गावर बांधण्यात येत असलेल्या मोनोरेल प्रकल्पाचे काम सुरू असताना साने गुरूजी मार्गावर एक कामगार क्रेनच्या खाली सापडून ठार झाला.
काम सुरू असताना एक क्रेन काँक्रिट फनेल उचलून नेत होती. त्यावेळी मोहम्मद हमीद आलम (२१) हा कामगार क्रेनला दिशा देण्याचे काम करत होता. त्यावेळी तो क्रेनच्या खाली सापडून ठार झाला. प्राथमिक अंदाजानुसार आलमचा पाय घसरून तो पडला व क्रेनचालकाला ते न दिसल्याने हा अपघात घडला.
या प्रकरणी कामगाराच्या कुटुंबीयांना नियमानुसार भरपाई कंत्राटदाराकडून मिळेल, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले.
मागच्या वर्षी वडाळय़ात मोनोचे काम सुरू असताना क्रेनच्या धडकेने एक जण ठार झाला होता. तर यावर्षी फेब्रुवारीमध्ये सहार उन्नत मार्गाचा भाग कोसळून अपघात झाला होता.
मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये मेट्रोच्या स्थानकाचे काम सुरू असताना स्लॅब कोसळून एक जण ठार तर १६ जखमी झाले होते. जुलै २०१२ मध्ये पूर्व मुक्त मार्गावर गर्डर कोसळून एक ठार व सात जखमी झाले होते. तर जुलै २०११ मध्ये मोनोरेलचा गर्डर कोसळून दोन मजूर ठार तर तीन जखमी झाले होते.

Story img Loader