इमारतीची डागडुजी करायची आहे असे सांगून घरात येऊन एका मजुराने कपाटातील आठ लाखांचे ४२ तोळे सोने चोरून नेल्याची घटना कॅसल मिल भागात शुक्रवारी सकाळी घडली. आझादनगर भागातील साई पार्क सोसायटीत राहणाऱ्या ज्योती जाधव यांच्या घरात शुक्रवारी सकाळी एक अनोळखी व्यक्ती आली. त्याने आपण इमारतीची डागडुजी व रंगकाम करणार आहोत, असे सांगितले. जाधव यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला साहित्य झाकण्यासाठी रद्दी पेपर व गव्हाची खळ करून दिली. या गडबडीत त्या मजुराने त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने लंपास केले. राबोडी पोलिस या भामटय़ा मजुराचा शोध घेत आहेत.