विनयभगांचा आरोप असणारा वॉर्डबॉय निलंबित
जी.टी. रुग्णालयामध्ये नर्सिगच्या विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याच्या प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे परिचारिकांच्या संघटना विरुद्ध चतुर्थ श्रेणी कामगार संघटना असा संघर्ष सुरू झाला आहे. मंगळवारी चतुर्थ श्रेणीतल्या कामगारांनी आणि बुधवारी परिचारिकांच्या संघटनेने जी.टी. रुग्णालयात आंदोलन केले. दरम्यान, विनयभंगाचा आरोप असणाऱ्या वॉर्डबॉयवर गुन्हा दाखल झाला असून त्याला निलंबित करण्यात आले आहे.
शनिवारी जी. टी. रुग्णालयातील वॉर्डबॉय मोहन ढमाले याने आपला विनयभंग केल्याची तक्रार एका नर्सिगच्या विद्यार्थीनीने केल्यानंतर त्या वॉर्डबॉयविरोधात पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
परंतु ती विद्यार्थीनी मानसिक रुग्ण असून तिने ढमालेवर केलेले आरोप खोटे असल्याचे सांगत चतुर्थश्रेणी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी आंदोलन केले.
तर चतुर्थश्रेणी कामगार संघटना जाणीवपूर्वक या विद्यार्थीनीला मानसिक रुग्ण ठरवित असल्याचा प्रत्यारोप करीत बुधवारी बृहन्मुंबई राज्य सरकारी परिचारिका संघटनेने आंदोलन केले. शेवटी वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.