कामगारांच्या व परिचरिकांच्या विविध मागण्या अद्याप मान्य न झाल्यामुळे रुग्णालयायील म्युनिसिपल मजदूर युनियनने ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे. उद्या सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून हे आंदोलन सुरू होईल असा इशारा देण्यात आला आहे. के. ई. एम, नायर, शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय या मनपाच्या सर्वसाधारण रुग्णालयातील परिचारिका व अन्य यांना महीन्याला आठ साप्ताहिक सुट्टी दिल्या जातात याच धर्तीवर पालिकेच्या शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील परिचारिका यांनाही साप्ताहिक सुट्ट्या दिल्या जाव्यात अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे.
हमालाची पदे भरणे, कालबध्द पदोन्नती देण्यास प्रशासनाचा हलगर्जीपणा केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. मागण्या पूर्ण न झाल्यामुळे कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन करीत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. रोजंदारी कामगारांना दिला जात असलेला मानसिक त्रास, केली जात असलेली पिळवणूक दूर करून न्याय द्यावा अशी मागणी संघटनेने अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे व ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.