लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : दोन महिन्यांचे वेतन आणि दिवाळी बोनसची रक्कम अद्यापपर्यंत न मिळाल्याने रोजंदारीवर असलेल्या व बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगिता रावत यांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. तसेच वेतन व दिवाळी बोनस तातडीने न मिळाल्यास पुढील आठवड्यात दर सात दिवसांनी काळ्या फिती लावून निषेध करण्यात येईल. तसेच हे आंदोलन प्रत्येक आठवड्यात अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. मात्र या आंदोलनानंतर प्रशासनाने कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन तातडीने देण्याचे आदेश दिले.
राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या सफाईगार कक्ष परिचर आया व इतर ‘ड’ संवर्गातील रिक्त पदे नियमित भरण्यासापेक्ष कंत्राट तत्वावर रोजंदारी व बहुउद्देशीय कामगार नियुक्त करण्यात आले आहेत. यापैकी २५० बहुउद्देशीय कामगारांच्या कंत्राट तत्वाचा कालावधी ३१ जानेवारी २०२५ रोजी संपुष्टात आला. या कामगारांची नियुक्ती सातत्य राखण्याचा प्रस्ताव सक्षम अधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. मंजुरी प्राप्त होताच या कामगारांना देय असलेले फेब्रुवारी २०२५ व मार्च २०२५ तसेच आगामी कालावधीचे वेतन देण्यात येईल.
दोन महिने विनावेतन…
मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयामधील रिक्त पदांवर सफाईगार, कक्ष परिचर, आया व इतर ‘ड’ संवर्गातील रिक्त पदे नियमित भरण्यासापेक्ष कंत्राट तत्वावर २५० रोजंदारी व बहुउद्देशीय कामगार नियुक्त करण्यात आले आहेत. या बहुउद्देशीय कामगारांचे कंत्राट ३१ जानेवारी २०२५ रोजी संपुष्टात आले आहे. या कामगारांची नियुक्ती सातत्य राखण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र दोन महिने झाले तरी त्यावर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने मागील दोन महिन्यांपासून हे कर्मचारी विनावेतन काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांना दिवाळीमध्ये जाहीर करण्यात आलेला पाच हजार रुपये बोनसही अद्याप देण्यात आलेला नाही.
कामगारासमोर आर्थिक पेच
दोन महिने वेतन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांसमोर घरखर्च कसा भागवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांच्या शाळेचे शुल्क, विमा योजनांचे हफ्ते, घराच्या कर्जाचे हफ्ते थकल्यामुळे त्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. कामगारांचे होणारे हाल प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १५० ते २०० रोजंदारी व बहुउद्देशीय कामगारांनी मंगळवारी सकाळी केईएम रुग्णालयात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.
रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांना गुलाब पुष्प देऊन त्यांनी कामगारांना वेतन व बोनस वेळेत देण्याची विनंती केली. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ मोहन देसाई व संबंधित अधिकारी उपस्थित होते. म्युनिसिपल मजदूर युनियनचे उपाध्यक्ष अनिल निरभवने, संघटक रामगोपाल डागोर, शंकर खरात, प्रफुल्ल अहिरे, विठ्ठल गावडे तसेच तक्रार निवारण समितीचे सरचिटणीस वैभव जुवेकर, राजकुमार चौटाले, हेमंत माळूंजे, युवा सरचिटणीस संजय बोंद्रे, सुमित चंडालिया तसेच रोजंदारी बहुउद्देशीय कामगारांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने हजर होते.
…तर आंदोलन तीव्र
महापालिका प्रशासनाने वेतन व बोनस देण्यास विलंब केल्यास पुढच्या आठवड्यात २९ एप्रिल रोजी काळया फिती लावून निषेध व्यक्त करण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक आठवड्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. ६ मे रोजी ठिय्या आंदोलन, १३ मे रोजी ‘दे दान आंदोलन’, आणि १३ मे रोजी ‘थाली नाद’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनने दिला आहे.
लवकरच वेतन मिळणार
रोजंदारी व बहुउद्देशीय कामगारांच्या वेतनाबाबतची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिल्यानंतर त्यांनी तातडीने उप प्रमुख लेखापाल (रुग्णालये) भगवंत शिंगाडे यांना कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच कामगारांना वेतन मिळेल. -डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय