किटकनाशक विभागाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता, कीटक संकलक, प्रतिवेदन वाहक यांची रिक्त असलेली १२१ पदे पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावीत, याबाबत दि म्युनिसिपल युनियन सातत्याने पाठपुरावा करत आहोत. मात्र त्याकडे मुंबई महानगरपालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित कामगारांचे आर्थिक व सामाजिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पावसाळा सुरु होण्यापूर्वी म्हणजेच १५ जूनपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, अन्यथा १६ जूनपासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दि म्युनिसिपल युनियनने दिला आहे.
वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता, कीटक संकलक, प्रतिवेदन वाहक या संवर्गाची सर्व पदे पावसाळ्यापूर्वी भरण्यात येतील, असे किटकनाशक अधिकारी यांनी आश्वासन दिले होते. परंतु दोन महिन्याहून अधिककाळ होऊन देखील तसेच पावसाळा तोंडावर आला असताना देखील या पदावर कामगारांना पदोन्नती देण्यात आलेली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झालेला आहे. हा असंतोषाचा उद्रेक कोणत्याही क्षणी होईल आणि नाईलाजाने तसे झाल्यास ऐनपावसाळ्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीस आणि त्यामुळे मुंबईच्या नागरीकांना होणाऱ्या त्रासास प्रशासन जबाबदार राहील, याकडे संघटनेने प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधलेले आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता, कीटक संकलक, प्रतिवेदन वाहक यांची रिक्त पदे १५ जून २०२३ पूर्वी पदोन्नतीने न भरल्यास १६ जून २०२३ पासून किटकनाशक अधिकारी यांच्या अधिपत्याखालील सर्व कामगार प्रखर आंदोलन करतील, असा इशारा दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिला आहे.