मराठी वाङ्मय व्यवहाराच्या कक्षा रुंदाविण्यासाठी आवश्यक वाचन संस्कृतीचा परीघ वाढविण्यात कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाने गेल्या चार वर्षांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून महाराष्ट्रभर वितरित करण्यात आलेल्या २८१ पेटय़ांद्वारे २८ हजारांहून अधिक पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचली आहेत. महाराष्ट्राबाहेर बडोदा आणि अहमदाबाद येथेही ग्रंथपेटय़ा पोचल्या असून येत्या महाराष्ट्रदिनी नवी दिल्लीत पाच पुस्तक पेटय़ा तेथील मराठी वाचकांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
२००९ मध्ये कुसुमाग्रज प्रतिष्ठानने नाशिकमध्ये ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली. या योजनेत एका पेटीत २० हजार रुपये किमतीची शंभर पुस्तके असतात. या ग्रंथपेटीसाठी महाराष्ट्रभरातून स्वयंस्फूर्तीने प्रायोजक पुढे येत आहेत. बँका, कंपन्यांबरोबरच साहित्यप्रेमी व्यक्तीही २० हजार रुपये देऊन या वाङ्मययज्ञात सहभागी होत आहेत. त्यामुळेच चार वर्षांत तब्बल २८१ पेटय़ा महाराष्ट्रात सर्वत्र पोहोचू शकल्या, अशी माहिती या उपक्रमाचे संयोजक विनायक रानडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
‘ग्रंथ आपल्या दारी’ उपक्रमातील ही शंभर पुस्तकांची पेटी ३५ वाचकांच्या समूहात चार महिन्यांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते. त्यानंतर ती पेटी दुसऱ्या वसाहतीत जाते. या उपक्रमात पेटीची देखभाल, वाहतूक, पुस्तकांची हाताळणी ही कामे तब्बल ५०० स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने पदरमोड करून करीत आहेत. नाशिकमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाचे लोण  राज्यात पोहचले.
साक्षर बनले वाचक
या उपक्रमाचे नाव ‘ग्रंथ आपल्या दारी’ असे असले तरी त्यातील पुस्तके केवळ घरातच गेली नाहीत. नाशिक ठाणे येथील मध्यवर्ती कारागृह, रुग्णालय, अनाथ आश्रम आदी ठिकाणीही अक्षर वाङ्मयाचा हा ठेवा पोचला आहे.
ग्रंथभार वाहणारे मालेगावचे हमाल
रामनवमीच्या दिवशी या उपक्रमातील २८१ वी पेटी मालेगांव येथे हमाल काम करणारे दीपक पगारे यांना देण्यात आली. गेली चार वर्षे पगारे मालेगांवमधील सटाणा नाका येथे कामगारांना वर्तमान पत्र वाचण्यास उपलब्ध करून देत आहेत. इतिहास विषय घेऊन पदवी मिळविलेल्या पगारेंना वाचनाची आवड आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रभक्तीपर उपक्रम राबविणाऱ्या वंदे मातरम या संस्थेतही ते कार्यरत आहेत.

Story img Loader