सलग नऊ सामन्यांत विजय मिळवणाऱ्या यजमान भारतीय संघाचा सामना ‘आयसीसी’ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य सामन्यात बुधवारी न्यूझीलंड संघाशी होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. भारतीय संघाने विश्वचषकात अपेक्षेनुसार कामगिरी केली आहे. फलंदाजी व गोलंदाजी सर्वच आघाड्यांवर संघाने चमक दाखवली आहे. हा सामना पाहण्यासाठी मुंबईसह आजूबाजूच्या शहरातील क्रिकेटप्रेमी मुंबईत येणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी क्रिकेटप्रेमींना काही सूचना केल्या आहेत. त्याबाबत त्यांनी X वर व्हिडीओही पोस्ट केला आहे.
“१५ नोव्हेंबर २०२३ रोजी भारत विरुद्ध न्युझिलंड या सेमी फायनल सामन्यासाठी मुंबई पोलीस दल वानखेडे स्टेडिअमवर सज्ज आहे”, अशी माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. ते म्हणाले की, वानखेडे स्टेडिअमवर सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रेक्षकांना स्टेडिअमवर प्रवेश देताना सुरक्षेच्या कारणास्तव विलंब होतो. विलंब टाळण्यासाठी प्रेक्षकांनी सकाळी साडे अकरा वाजता स्टेडिअमवर पोहोचावं. सामना दोन वाजता सुरू होणार आहे. परंतु, प्रवेश साडेअकरा वाजल्यापासून देण्यात येणार आहे.
“स्टेडिअममध्ये बॅग, पॉवर बॅग, नाणी, पेन्सिल, पेन, कोरे कागद, मार्कर, कोणत्याही प्रकारचे बॅनर्स, काही आक्षेपार्ह वस्तू, ज्वलनशील पदार्थ, काडीपेटी, लायटर, सिगारेट, गुटखा आदी वस्तूंना प्रतिबंध आहे. या वस्तू ठेवण्यासाठी स्टेडिअममध्ये सोय नाही, याची नोंद घ्यावी”, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. “प्रेक्षकांनी येताना खासगी वाहनांचा वापर न करता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. कारण, स्टेडिअम परिसरात पार्किंगची सुविधा उपलब्ध नाही. लोकल ट्रेनने येणाऱ्या प्रवाशांनी गेट नंबर १, २ आणि ७ वर पोहोचण्यासाठी चर्चगेट स्थानकावर उतरणे सोयीचे राहील. तर गेट क्रमांक ३, ४ आणि ५ वर पोहोचण्याकरता मरिन लाईन्स स्थानकावर उतरणे सोयीचे ठरेल”, असंही त्यांनी सांगितलं.
पोलिसांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावं. सुरक्षेच्या कारणात्सव या सूचना दिलेल्या असून आम्हाला सहकार्य करावं, असंही आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.