मुंबई : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णाला उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचण्यास मदत होते. ही बाब लक्षात घेऊन केईएम रुग्णालयात २०२२ मध्ये सुरू कलेल्या कॅथलॅबद्वारे राबविण्यात येत असलेल्या स्टेमी प्रकल्पामुळे रुग्णांवर तातडीने ॲन्जियोप्लास्टी करून १८९ रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. यामध्ये ४० टक्के रुग्ण हे ५० वयोगटाच्या आतील आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हृदयाच्या काही भागास होणारा रक्तपुरवठा थांबून प्राणवायूअभावी हृदयाच्या मांसपेशींना इजा होते. यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. स्टेमी म्हणजेच ‘एसटी एलिव्हेशन इन मायोकार्डियल इन्फार्क्शन’ हा प्रकार सामान्यतः आढळतो. या प्रकारामध्ये रुग्णाला ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळाल्यास त्याचे प्राण वाचण्याची शक्यता अधिक असते. ही बाब लक्षात घेत २०२२ मध्ये केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांच्या मार्गदर्शनाखाली कॅथलॅब सुरू करून स्टेमी प्रकल्प हाती घेण्यात आला. यामध्ये दोन प्रकारे उपचार केले जातात.

हेही वाचा >>> वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीचे वेळापत्रक जाहीर

पहिला प्रकार तातडीने ॲन्जिओप्लास्टी करणे किंवा थ्राँबोलायसिस उपचार करणे. मात्र थ्राँबोलायसिस उपचारांसाठी लागणारे इंजेक्शन महागडे आहे. केईएम रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील असतात. हृदयाशी संबंधित त्रास होत असल्यामुळे अतिदक्षता विभागामध्ये येणाऱ्या रुग्णाची तातडीने ईसीजी केली जाते. यामध्ये हृदयविकाराचा झटका येत असल्याची लक्षणे दिसल्यास रुग्णाची तातडीने ॲन्जिओग्राफी करून ॲन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला जातो. या वेगवान पद्धतीमुळे मागील पावणे दोन वर्षांमध्ये केईएम रुग्णालयात हृदयविकाराची समस्या घेऊन आलेल्या १८९ रुग्णांचे प्राण वाचविण्यात यश आल्याची माहिती केईएम रुग्णालयातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. चरण लांजेवार यांनी दिली.

हेही वाचा >>> मोफत आरोग्य सेवांमुळे आरोग्य विभागाच्या रुग्णालयात १३ कोटी रुग्णांनी घेतले उपचार!

केईएम रुग्णालयात पावणे दोन वर्षात हृदयविकाराच्या समस्येने आलेल्या १९४ रुग्णांमध्ये ६६ टक्के पुरुष, तर ३४ टक्के महिलांचा समावेश आहे. यापैकी ४० टक्के रुग्ण वय वर्ष ५० या वयोगटाखालील आहेत. तर ६० टक्के रुग्ण हे त्यावरील वयोगटातील आहेत. यापैकी ७० टक्के रुग्ण गंभीर अवस्थेत होते. तर ५० टक्के रुग्णांना उच्च रक्तदाब आणि ३५ टक्के रुग्णांना मधुमेहाचा त्रास होता. केईएम रुग्णालयात हृदयविकाराच्या त्रासाने उपचारासाठी दाखल झालेल्या १९४ रुग्णांपैकी अवघ्या पाच जणांचा मृत्यू झाल्याचे डॉ. लांजेवार यांनी सांगितले.

परळ, दादरमधील सर्वाधिक रुग्ण

हृदयविकाराचा झटका आल्यापासून सहा तासांमध्ये रुग्णाला रुग्णालयात आणल्यास त्याचे प्राण वाचवणे शक्य असते. केईएम रुग्णालयामध्ये आणण्यात येणाऱ्या या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण परळ, दादर, वरळी, प्रभादेवी आणि वडाळा या भागातील आहेत. साधारणपणे रुग्णालयापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील रुग्णांचा त्यात समावेश आहे.

हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवर खासगी रुग्णालयातच प्राथमिक उपचार मिळण्याची सुविधा उपलब्ध होती. सर्वसमान्यांना उपचार मिळावेत यासाठी २०२२ मध्ये कॅथलॅब सुरू करून रात्रीही तंत्रज्ञ व डॉक्टर उपलब्ध केले. वेळेतच रुग्णांवर ॲन्जिओप्लास्टी केल्यास हृदयाची काम करण्याची क्षमत कमी होत नाही आणि हृदय चांगले राहते. – डॉ. संगीता रावत, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World heart day kem hospital success in saving 189 patients life under stemi project mumbai print news zws