मुंबई : प्रशांत महासागरात पुढील तीन महिन्यांत ‘ला – निना’ स्थिती विकसीत होण्याची शक्यता आहे. मात्र, ही स्थिती तुलनेने कमकुवत आणि अल्प काळासाठी असल्यामुळे भारतासह जगातील अन्य देशांच्या हवामानावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही, असे मत विविध हवामान संस्था आणि शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक हवामान संस्थेच्या (डब्ल्यूएमओ) ‘ग्लोबल प्रोड्यूसिंग सेंटर्स ऑफ लॉन्ग-रेंज फोरकास्ट्स’ या विभागाने नुकताच एक सुधारित अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, प्रशांत महासागरात पुढील तीन महिन्यांत म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात ‘ला निना’ची स्थिती विकसित होण्याची शक्यता आहे. मात्र यंदाची ‘ला-निना’ स्थिती मागील ‘ला-निना’च्या तुलनेत कमकुवत असेल, शिवाय ही स्थिती अल्प काळासाठी राहण्याची शक्यता आहे. तीन महिन्यांत प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सध्याच्या तटस्थ स्थितीपासून ‘ला – निना’ स्थितीत संक्रमण होण्याची शक्यता ५५ टक्के आहे. तसेच फेब्रुवारी – एप्रिल २०२५ या कालावधीत तापमान तटस्थ स्थितीत येण्याची शक्यताही ५५ टक्के आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंतची प्रशांत महासागरातील निरीक्षणे आणि  नोंदी ‘एन्सो-तटस्थ’ स्थिती म्हणजे एल – निनो नाही आणि ला-निना ही नाही, अशी स्थिती दाखवितात. प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा थोडे कमी आहे. मात्र हे तापमान कमी असले तरीही अद्याप ‘ला – निना’ स्थितीच्या जवळ पोहोचले नाही.

हेही वाचा >>>जनावरांची अमानुष पद्धतीने होणारी वाहतूक रोखण्यासाठी काय प्रयत्न केले ? स्पष्टीकरण देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

यंदाचे वर्ष ठरणार आजवरचे उष्ण

जागतिक हवामान संस्थेच्या सरचिटणीस सेलस्टे साऊलो यांनी २०२४ हे वर्ष आजवरचे उष्ण वर्ष ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. २०२४ वर्षाची सुरुवात ‘एल-निनो’ने झाली होती. मागील अनेक महिन्यांपासून ला – निना स्थितीला पोषक वातावरण असले तरीही अद्याप ‘ला -निना’ स्थिती तयार झालेली नाही. आता फेब्रुवारी अखेरपर्यंत ला निना स्थिती निर्माण झाली तरीही तरीही तिचा अल्पकालीन असेल. प्रशांत महासागरात २०२४ च्या मे महिन्यापासून ‘एल-निनो’ किंवा ‘ला-निना’ स्थिती नसतानाही, जगाच्या अनेक भागाला अतिवृष्टी, आणि पुरांचा सामना करावा लागला. हवामान बदलाचा हा परिणाम आहे, असेही सेलस्टे साऊलो म्हणाल्या.

‘ला – निना’ अभावी देशात हिवाळा सरासरीपेक्षा उष्ण

संपूर्ण पावसाळ्यात ‘ला – निना’ विकसीत झाला नाही. तरीही देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. पण, हिवाळ्यातील अडीच महिने संपत आले तरीही ‘ला – निना’ सक्रीय झालेला नाही. त्यामुळे देशात हिवाळ्यातील कमाल – किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. शिवाय यंदाच्या हिवाळ्यात उत्तरेत थंडीच्या लाटा, थंडीचे दिवसही सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. श्रीजित यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: World meteorological organization forecast for cold weather mumbai print news amy