शैलजा तिवले, लोकसत्ता
मुंबई: मुंबईत १५ वर्षांखालील बालकांमधील क्षयरोगाचे प्रमाण मागील पाच वर्षांत सात टक्क्यांवरून नऊ टक्क्यांवर गेले आहे. यात प्रामुख्याने पाच वर्षांवरील बालकांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये क्षयरोगाचे प्रमाण मोठय़ा संख्येने वाढत असल्याचे आढळले आहे.
मुंबईत क्षयरोगाच्या निदानावर करोना साथीच्या काळात परिणाम झाला होता. परंतु गेल्यावर्षी पालिकेने निदानावर भर देत सुमारे ५९ हजार रुग्णाचे नव्याने निदान केले आहे. २०२० मध्ये हे प्रमाण ४३ हजार २४६ होते. क्षयरोगाच्या रुग्णांचे निदान अधिक होत असले तरी दुसरीकडे १५ वर्षांखालील बालकांमध्ये क्षयरोगाची लागण होण्याचे प्रमाणही वाढत आहे. २०१७ मध्ये एकूण बाधितांमध्ये बालकांचे प्रमाण सुमारे सात टक्के होते. या काळात सुमारे दोन हजारांहून अधिक बालकांमध्ये क्षयरोगाची बाधा झाली होती. २०१८ मध्ये हे प्रमाण जवळपास दुपटीने वाढून चार हजारांहून अधिक बालकांना क्षयाची बाधा झाल्याचे आढळले आहे. त्यानंतर मात्र करोनाची लाट आली त्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये हे प्रमाण चार हजारांच्या खाली गेले होते. परंतु २०२१ मध्ये पुन्हा बाधित बालकांची संख्या पाच हजारांच्याही पुढे गेली आहे. २०२१ मध्ये एकूण बाधितांमध्ये बालकांचे प्रमाण नऊ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
पाच वर्षांखालील बालकांमध्ये मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये बाधा होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे. २०१९ मध्ये साधारण हीच स्थिती होती. परंतु २०२० मध्ये यात मोठी तफावत असल्याचे आढळले. २०२० मध्ये क्षयरोग बाधित बालकांमध्ये मुलांचे प्रमाण ५६ टक्के तर मुलींचे प्रमाण ४४ टक्के होते. २०२१ मध्ये क्षयरोग बाधित बालकांमध्ये मुलींचे प्रमाण ४७ टक्के तर मुलांचे प्रमाण ५३ टक्के आहे. पाच वर्षांवरील म्हणजेच सहा ते १० वयोगटातील क्षयरोग बाधित बालकांमध्ये मात्र मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे. दहा वर्षांवरील बालकांमध्येही मुलांच्या तुलनेत मुलींमध्ये क्षयरोग बाधेचे प्रमाण अधिक पटीने वाढतच असून तफावत वाढली आहे. २०२१ मध्ये ११ ते १५ वयोगटातील बाधित बालकांमध्ये मुलींचे प्रमाण सुमारे ७५ टक्के, तर मुलांचे प्रमाण २५ टक्के आढळले आहे. २०१८ पासून हीच स्थिती कायम आहे.
बालकांमध्ये क्षयरोगाचे लागण होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने वाढत आहे. यासंबंधी सखोल अभ्यास केला जात असून बालकांचे निदान मोठय़ा प्रमाणात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात मुलींमध्ये हे प्रमाण १० वर्षांवरील बालकांमध्ये जास्त प्रमाणात आहे. घरामधील रुग्णाच्या सेवेमध्ये महिला, मुली यांचा सहभाग अधिक असतो. तसेच मुलींना पोषण आहारही तुलनेने घरामध्ये कमी मिळतो ही कारणे यामागे असण्याची शक्यता आहे. परंतु या मागची ठोस कारणे शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. – डॉ. मंगला गोमारे, पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी