Haji Ali Dargah Mumbai : हाजी अली दर्गा परिसरात जगातील सर्वात उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येणार असून त्यावर भारताचा राष्ट्रध्वज लावण्यात येणार असल्याची माहिती हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सोहेल खंडवानी यांनी दिली आहे. या दर्ग्याचे नुतनीकरण सुरू असून ध्वजस्तंभ उभारणीचे कामही सुरू आहे. तसेच या राष्ट्रध्वजाच्या अनावरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करणार असल्याचंही ते म्हणाले.
हेही वाचा – “हा भारताचा दुसरा स्वातंत्र्यलढा”, ‘भारत जोडो’ यात्रेवर पी. चिदंबरम यांचे विधान, भाजपावर सडकून टीका
“ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली होती. ही कल्पना त्यांना आवडली होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी या ध्वजस्तंभाची आठवण करून दिली आणि त्याला मान्यताही दिली”, असेही सोहेल खंडवानी म्हणाले. तसेच हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विविध संस्थांची मदत घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
जगातील सर्वात उंच ध्वजस्तंभ इजिप्तच्या कैरोमध्ये आहे. हा ध्वजस्तंभ २०२१ मध्ये बांधण्यात आला होता. त्यापूर्वी सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये सर्वात उंच्च ध्वजस्तंभ होता. त्याची उंची १७१ मीटर होती.