मुंबई: गेल्या विधानसभा निवडणूकीप्रमाणे वरळी मतदारसंघ यंदाच्या निवडणूकीतही चर्चेतला मतदारसंघ आहे. या मतदार संघातून आमदार आदित्य ठाकरे यांच्या समोर शिवसेनेच्या शिंदे गटाचा कोण उमेदवार असणार याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असून मोठा आश्चर्याचा धक्का देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र शिंदे शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनी इथे स्थानिकच आमदार हवा अशी जाहीर मागणी करत वरळीत सोमवारी विधानसभा प्रमुख दत्ता नरवणकर यांनी शक्तीप्रदर्शनही केले.
वरळी विधानसभा मतदार संघ हा आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. आदित्य ठाकरे हे यावेळी या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून त्यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाने, महायुतीने प्रचंड शोधाशोध सुरू ठेवली आहे. उमेदवार जिंकून येण्याची शक्यता किती त्याची चाचपणी करून त्या तोडीचा उमेदवार देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा या मतदार संघात आहे. आदित्य ठाकरे यांच्यासाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाची संपूर्ण फौज असून हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात आधीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार संदीप देशपांडे यांनी प्रयत्न सुरू केला आहे. मनसेने त्यांचे नाव जाहीर केले नसले तरी देशपांडे यांनी मतदार संघात जनसंपर्क वाढवला आहे. त्यामुळे या दोघांच्या लढतीत आता शिंदे शिवसेनेकडून कोणाचे नाव पुढे येते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.
हेही वाचा : दिवाळीनिमित्त प्रवाशांच्या सोयीसाठी दादर-काजीपेट विशेष रेल्वेसेवा
शिंदे यांच्या शिवसेनेनेकडून माजी नगरसेवक दत्ता नरवणकर हे इच्छुक आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर नरवणकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. सध्या त्यांच्याकडे विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी आहे. त्यांच्या नावाची चर्चा असतानाच या मतदार संघात गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या शायना एन सी या देखील इच्छुक असल्याचे ऐकायला मिळत आहे. दुसरीकडे बाहेरून मोठा उमेदवार आणला जाणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. त्यामुळे नरवणकर यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता असून सोमवारी वरळीत स्थानिक उमेदवारच द्या अशी मागणी करण्यात आली.
हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्यासाठी शासनाने तत्काळ निधी द्यावा, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी
आदित्य ठाकरे यांच्यासमोर मोठे नाव असलेला उमेदवाराची शोधाशोध महायुतीतर्फे सुरू आहे. ठाकरे यांना या मतदार संघात अडकून राहावे लागेल अशी वेळ यावे इतक्या मोठ्या नावाचा शोध सुरु आहे. त्याचबरोबर त्या नावाची जिंकून येण्याची शक्यता किती याचीही चाचपणी सुरू आहे. मात्र हे सारे सुरू असतानाच पक्षांतर्गत समर्थकांचे म्हणणेही पक्षाला ऐकावे लागणार आहे.