विकासकाची परवानगी मिळाली नसल्याचे कारण
बेस्टच्या बस थांबविण्यासाठी वरळी गाव येथे नव्याने बांधण्यात आलेल्या टर्मिनसच्या उद्घाटनाला सहा महिने उलटले तरी मुर्हूत मिळत सापडत नसल्याने येथील रहिवाशांना रस्त्यावर उभे राहुनच गाडय़ा पकडाव्या लागत आहेत. याचबरोबर या टर्मिनसमध्ये नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचीही मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. इतकेच नव्हे तर बेस्टच्या या जागेचा वापर टर्मिनसलगत सुरू असलेल्या इमारत बांधकाम व्यावसायिकांचे सामान उतरविण्यासाठी करत असल्याचेही स्थानिकांनी निर्दशनास आणून दिले आहे.
टर्मिनसलगत सुरू असलेले इमारतीचे काम हे ‘झोपू’ योजनेअंतर्गत सुरू असून हे काम करणाऱ्या विकासकानेच हे टर्मिनस उभे करुन दिले आहे. यामुळे विकासक परवानगी देईल तेव्हाच उद्घाटन होईल, असे सांगण्यात येत आहे. याचबरोबर टर्मिनसवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांसाठी एक सूचना फलक लावण्यात आला असून त्यावर, ‘जर चालकाने बस वळवताना टर्मिनसची हानी केल्यास किंवा वाहक नसतानादेखील बस वळवण्याचा प्रयत्न केल्यास कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणा करिता शिस्तभंग दाखल करण्यात येईल’ अशी धमकीवजा सूचना लिहीली आहे. जागा मोठी असल्याने याठिकाणी चालक बस वळविण्यासाठी या जागेत येत असतो. मात्र, रात्रीच्या वेळेला या टर्मिनसचे दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात येतात यामुळे अनेकवेळा अडचणी निर्माण होत आहेत.
पूर्वी याठिकाणी बस प्रवर्तक आणि बस पासच्या चौक्या होत्या. मात्र या चौक्यांचे बांधकाम पाडून त्यांना एका पत्र्याच्या शेडमध्ये जागा देण्यात आली आहे. या शेडची जागा कमी असल्याने येथे कर्मचाऱ्यांना बसायलाही धड जागा होत नाही, तर बस पाससाठी बांधण्यात आलेल्या शेडमध्ये व्यवस्थे अभावी प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आपल्या हक्काची जागा समोर असताना देखील कर्मचाऱ्यांना सकाळी ५ वाजेपासून ते रात्री १२.४० पर्यंत या शेडमध्ये बसावे लागत आहे.

टर्मिनससाठीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि नळ जोडणी परवानगी बाकी असून ते काम विकासकाकडून पूर्ण झाल्यानंतर आम्ही हे टर्मिनस वापरण्यास सुरुवात करू.
जगदिश पाटील, बेस्टचे महाव्यवस्थापक

Story img Loader