मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या वरळी मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे गटात तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. आदित्य ठाकरे हे सध्याचे वरळीचेआमदार असले, तरी ते वरळीचे स्थानिक रहिवासी नाहीत. शिंदे गटाकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनसेनेही संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु, देवरा यांच्यासह देशपांडे देखील स्थानिक ‘वरळीकर’ नाहीत. तिन्ही प्रमुख पक्षांनी वरळीत बाहेरील व्यक्तींना उमेदवारी दिली आहे.त्यामुळे स्थानिक या मुद्द्यावरून उमेदवारांना नाराजीचा सामना करावा लागू शकतो.
वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुलाला म्हणजेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना या मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवले होते. आदित्य यांनी देखील या मतदारसंघात मोठ्या मतांच्या फरकाने विजय मिळवला होता. आदित्य हे वरळीचे स्थानिक रहिवासी नाहीत. शिंदे गटाकडून राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. देवरा हे वरळीकर नसून, ते कंबाला हिल (पेडर रोड) परिसरात वास्तव्यास आहेत.
हेही वाचा…बिष्णोई टोळीच्या नावाने आता फॅशन डिझायनरला दूरध्वनी, ५५ लाख रुपयांची मागणी
u
आदित्य ठाकरे यांच्या उमेदवारीमुळे गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने वरळीत उमेदवार उभा केला नव्हता. पण यावेळी मनसेनेही वरळीतून संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. आदित्य ठाकरे आणि मिलिंद देवरा यांच्याप्रमाणे देशपांडे हेही स्थानिक वरळीकर नाहीत. ते माहीम येथील रुपारेल महाविद्यालय परिसरातील रहिवासी आहेत.
अन्य पक्षांची स्थानिकांना पसंती
एकीकडे प्रमुख पक्षांनी वरळीबाहेरील उमेदवारांना पसंती दिलेली असताना, दुसरीकडे वरळी मतदारसंघातून बहुजन समाजवादी पक्षाचे सुरेश गौतम, वंचित बहुजन आघाडीचे अमोल निकाळजे यांना, ‘एपीआय’कडून भीमराव सावंत, ‘एआयएम’कडून रिझवान कादरी यांना उमेदवारी दिली आहे. हे सर्व वरळीतील रहिवासी आहेत. तसेच, अपक्ष उमेदवार मोहम्मद कादरीही स्थानिक वरळीकर आहेत. याशिवाय, बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेले भगवान नागरगोजे हे देखील वरळीतून निवडणूक रिंगणात आहेत. तसेच, ताडदेव परिसरात राहणारे अमोल रोकडेही हे देखील या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.
एकमेव महिला उमेदवाराचीही माघार
वरळी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट, मनसे, बहुजन समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिक सेना, समता पार्टी यांचे उमेदवार रिंगणात आहेत. परंतु एकाही पक्षाने महिलेला उमेदवारी दिलेली नाही. यापूर्वी, वरळीतून साक्षी पाटोळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. पण, त्यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे, वरळीत सध्या एकही महिला उमेदवार नाही.