मुंबईतल्या वरळी भागात भरधाव वेगात बीएमडब्ल्यू कार चालवून महिलेला चिरडल्याची घटना रविवारी पहाटे ( ७ जुलै रोजी ) घडली होती. या घटनेत कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणीही पुढे येत होती. अशात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीडित कुटंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा – Hit and Run: आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, “मिहीर शाह राक्षस आहे, पाच मिनिटांसाठी त्याला…”…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत कोस्टल रोडची पाहणी केली. या पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयावर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना वरळी अपघाताबाबत तसेच पीडित कुटंबाला आर्थिक मदत देण्याबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, आम्ही पीडित कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
नेमक काय म्हणाले एकनाथ शिंदे?
वरळी हिट अॅंड रन प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे तसेच जे पब आणि बार रात्री उशीरापर्यंत चालतात, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मी पहिल्या दिवसांपासूनच दिले आहेत. पुण्याच्या प्रकरणातही मी अशाचप्रकारे आदेश दिले होते. त्यानंतर झालेली कारवाई सर्वांनी बघितली. वरळीच्या प्रकरणातही कारवाई सुरू आहे. जे अवैध काम करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे बोलताना, पीडित कुटुंबाला आर्थिक कुटुंबाला आर्थिक मदत देणार का? असं विचारलं असता, आम्ही पीडित कुटुंबाच्या बरोबर आहोत. ते आमच्याच परिवारातील सदस्य आहेत. त्यांना जी काही मदत लागेल, मग ती कायदेशीर असो, किंवा आर्थिक असो, त्यांना मदत केली जाईल. त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
हेही वाचा – Worli Hit and Run Case : मिहीर शाहला १६ जुलैपर्यंत कोठडी; कोर्टात दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तीवाद
अस्लम शेख यांनी केली होती मदतीची मागणी
तत्पूर्वी वरळी हिट अॅंड रन प्रकरणातील पीडित महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी विधान भवनात केली होती. वरळी हिट अॅंड रन प्रकरणात मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना शासनातर्फे अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. एकीकडे शासन कोट्यवधी रुपये वाटत आहे. मात्र जे कोळी बांधव या मुंबईचे भूमिपुत्र आहेत, त्यांच्या घरातील महिलेचा अपघाती मृत्यू घडून २ दिवस झाल्यानंतरही सरकारकडून मदत मिळणार नसेल तर ‘जनसामांन्यांचं सरकार’ ही बिरुदावली मिरवण्याचा सरकारला अधिकार आहे का, याचा सरकारने विचार करावा, असे ते म्हणाले होते.