मुंबई : वरळी येथील अपघाताप्रकरणी अटकेत असलेला शिवसेना (एकनाथ शिंद) नेत्याचा मुलगा मिहीर शहा याला मानवी जीवनाची काडीचीही पर्वा नाही. अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने शहा याची अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळताना केली. आरोपीला अटकेच्या कारणांची माहिती देणे कायद्याने अनिवार्य आहे. मात्र, हे प्रकरण या नियमाला अपवाद आहे. या प्रकरणातील आरोपींना त्यांनी केलेल्या भयंकर कृत्याची आणि त्याच्या परिणामांची पूर्ण माहिती होती, असेही न्यायालयाने शहा याच्यासह त्याचा चालक राजऋषी बिडावत याला दिलासा नाकारताना प्रामुख्याने अधोरेखीत केले.
अपघाताच्या वेळी मिहीर हाच गाडी चालवत होता हे सीसीटीव्ही चित्रणातून उघड झाल्याचेही न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने आदेशात नमूद केले आहे. मिहीर आणि बिडावत यांना झालेली अटक ही कायदेशीरच होती. त्यात काहीच बेकायदा नाही, असे स्पष्ट करून खंडपीठाने सोमवारी दोघांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. न्यायालयाच्या आदेशाची प्रत बुधवारी रात्री उशिरा उपलब्ध झाली. अटक करताना ती करण्याची कारणे आपल्याला सांगण्यात आली नव्हती, असा दावा करून मिहीर आणि बिडावत यांनी अटकेला आव्हान दिले होते. तसेच, अटक बेकायदा ठरवून आपली तातडीने जामिनावर सुटका करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.
तथापि, अशा स्वरूपाच्या गंभीर गुन्ह्यात तेही घटनेच्या वेळी दोन्ही आरोपी गाडीत होते. तसेच, त्यातील एकजण गाडी चालवत होता हे पुराव्यांतून स्पष्ट झालेले असताना आपल्याला अटकेची कारणे लेखी स्वरूपात सांगितली गेली नसल्याचा बचाव आरोपी करू शकत नाहीत, असे ठाम मतही न्यायालयाने व्यक्त केले. आरोपींच्या अधिकारांचा विचार करताना मृत महिलेच्या कुटुंबीयांना झालेला त्रास, त्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले.
हेही वाचा – ‘वंचित’मुळे मविआला २० जागांवर फटका; मतटक्का राखण्यात प्रकाश आंबेडकर यांना यश
आरोपींना मानवी जीवनाची काडीचीही पर्वा नाही. त्यांनी तक्रारदाराच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे तक्रारदाराची पत्नी दुचाकीवरून जमिनीवर पडली आणि जखमी झाली. परंतु, तिला रुग्णालयात नेण्याऐवजी आरोपीने निर्दयीपणे गाडी चालवणे सुरूच ठेवले. तसेच, तक्रारदाराच्या पत्नीला दीड किमीपर्यंत फरफटत नेले. त्यानंतर, घटनास्थळावरून पळ काढला. दोन दिवसांनी त्याला अटक करण्यात आली, अशी टिप्पणीही न्यायालयाने मिहीर याची अटक कायदेशीर ठरवताना केली. दोन्ही आरोपींनी घटनेच्या वेळी मद्यपान केले होते आणि मिहीर बेदरकारपणे आणि भरधाव वेगाने गाडी चालवत होता. त्यावेळी, त्याचा चालक बिडावत त्याच्या बाजूला बसला होता. परंतु, अपघातानंतर त्यांनी गाडीतील एकमेकांच्या जागा बदलल्या हे सीसीटीव्हीतील चित्रणातून आणि साक्षीदारांच्या साक्षीतून सकृतदर्शनी स्पष्ट होते, असेही न्यायालयाने म्हटले.