मुंबई : एखाद्या व्यक्तीला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले किंवा पकडले गेल्यास त्याला अटकेच्या कारणांची माहिती देणे ही निव्वळ एक औपचारिकता असते. मद्यपान करून बेदरकारपणे गाडी चालवणे आणि सदोष मनुष्यवधासाठी कारणीभूत ठरण्याच्या प्रकरणात तर या नियमाचे पालन न केल्याने फारसा फरक पडत नाही, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. तसेच, गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगितले नसल्याचा दावा करून अटकेला आव्हान देणाऱ्या वरळी येथील अपघातातील आरोपी मिहीर शहा याच्या दाव्याबाबत न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याचप्रमाणे, मिहीर याच्या याचिकेवर २१ नोव्हेंबर रोजी निर्णय देण्याचे स्पष्ट केले. अटक करताना ती करण्याचे कारण सांगितले नसल्याचा दावा करून मिहीर आणि त्याचा चालक राजऋषी बिडावत यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तसेच, अटक बेकायदा ठरवून तातडीने जामिनावर सुटका करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवण्यापूर्वी न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने मिहीर आणि बिडावत यांच्या दाव्याबाबत उपरोक्त प्रश्न उपस्थित केला. याचिकाकर्त्याला गुन्हा करताना प्रत्यक्ष पाहिले गेले आहे. त्यानंतरही त्याला अटकेचे कारण माहिती नाही ? अटकेचे कारण सांगितले नाही म्हणून त्यांची अटक ही बेकायदा कशी ठरते ? प्रत्येक प्रकरणातील तथ्य आणि परिस्थिती वेगवेगळी असते. त्यानुसार, कार्यवाही करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, मिहीर आणि बिडावत यांच्या दाव्याबाबत आश्चर्य व्यक्त केले.

हेही वाचा – मुंबई विमानतळावर दीड महिन्यात २१ धमक्या

हेही वाचा – ‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा

याचिकाकर्त्यावरील आरोप लक्षात घेता त्याने मद्याच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून आधी दुचाकीला धडक दिली. त्यानंतर, धडकेमुळे, दुचाकीवरून पडलेल्या महिलेला काही अंतरापर्यंत फरफटत नेले. एवढेच नाही, तर याचिककर्ता इतक्या घाईत होता की तो फास्टॅग कार्ड मागे विसरला, त्याचाही त्याला विसर पडला. त्यामुळे, या प्रकरणाकडे उदाहरण म्हणून पाहण्याची गरज आहे, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. आरोपीला त्याने केलेल्या कृत्याची माहिती असतानाही निव्वळ औपचारिकता म्हणून त्याला ताब्यात घेत असल्याची माहिती द्यावी लागते. परंतु, सर्वकाही माहिती असूनही आपल्याला अटकेचे कारण सांगितले नाही या मिहीर याच्या दाव्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान, मिहीर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. त्याच्यावर मद्याच्या नशेत भरधाव बीएमडब्ल्यू चालवून कावेरी नाखवा (४५) या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. मिहीरने ९ जुलै रोजी मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू कार चालवताना नाखवा दाम्पत्याच्या दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे जमिनीवर पडलेल्या कावेरी यांना रुग्णालयात नेण्याऐवजी त्याने गाडीनेच दीड किमीपर्यंत फरफटत नेले होते. यात कावेरी यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर मिहीर घटनास्थळावरून पळून गेला. राजेश शहा यांनाही पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक केली होती. मात्र, त्यांना जामीन मिळाला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worli hit and run case high court questions mihir shah claim mumbai print news ssb